मुंबई :  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकासकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडले. तसेच म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. पण मेसर्स गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून नऊ विकासकांना एफएसआय विकून सुमारे ९०१ कोटी ७९ लाख रुपये रक्कम वसूल केली. या वेळी ६७२ भाडेकरू आणि म्हाडा यांना करारानुसार सदनिका देण्यात आल्या नाहीत. पुढे मेसर्स गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने मीडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि सदनिका विक्रीच्या नावाखाली सुमारे १३८ कोटी रुपये स्वीकारले. मेसर्स गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून एकूण १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे.

ईडीने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. २०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. वर्षां राऊत यांनी ही रक्कम दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. तसेच अलिबागमध्येही भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने काही मालमत्तांवर टाच आणली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed sanjay raut political atmosphere directorate recovery ysh
First published on: 28-06-2022 at 01:58 IST