मुंबई : महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांतील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यातून सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, जवळपास २८३ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.

मुंबईत गेल्या २८ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, सुमारे २८३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर, फायरेक्स यंत्र, मिस्टींग यंत्र आणि अन्य अद्ययावत यंत्रणासह तब्बल १ हजार ३३२ कामगार व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली.

हेही वाचा – मुंबई : उकाडा, ब्लॉक, वाहतूककोंडी, गर्दीने प्रवासी हैराण

हेही वाचा – जनऔषधी केंद्रांमध्ये कर्करोग, प्रतिजैविके आदींच्या विक्रीला औषध कंपन्यांचा विरोध

पालिकेच्या ए विभागातील बोरा बाजार, सर फिरोजशाह मेहता मार्ग, पेरी नरिमन मार्ग, डी विभागात नाना चौक, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, जी दक्षिण विभागात धोबीघाट, सुदाम काळू अहिरे मार्ग, जी उत्तर विभागात शाहूनगर, धारावी, एच पूर्व विभागात सांताक्रुज येथे इंडियन ऑईल कंपनी प्रवेशद्वार ते हनुमान टेकडी परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८३ मधील झोपडपट्टी व आसपासचा परिसर, के पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्य पालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, एल विभागात साकीनाका येथील एस. जे. स्टुडिओ ते खैरानी मार्ग, एम पूर्व विभागात सोनापूर मार्ग, पी दक्षिण विभागात महात्मा गांधी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, पी उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोड रस्ता, आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्व येथे आकुर्ली मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात अमरकांत झा मार्ग, ब्रह्मा विष्णू महेश मार्ग, शिंपोली मार्ग, मल्हारराव कुलकर्णी मार्ग, टी विभागात मुलुंड आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.