मुंबई : येत्या शनिवारपासून सलग चार दिवस सुट्टय़ांमुळे अनेकांनी पावसाळय़ात पर्यटनस्थळी जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर पर्यटकांना खासगी प्रवासी बससाठी अवाच्यासव्वा भाडे मोजावे लागणार आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत मुंबई महानगरातून राज्यातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे कोकण, गोवासह महाबळेश्वरला जाण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळा असल्याने काही जणांनी चार ते पाच दिवस बाहेरगावी जाण्यासाठी महाबळेश्वरबरोबरच कोकण, गोवा अशा पर्यटनस्थळांची निवड केली आहे. त्यानुसार मुंबई महानगरातून या पर्यटनस्थळी जाण्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी भाडेदरात वाढ केली आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईतून गोवासाठी वातानुकूलित स्लीपर बसचे भाडे अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. सध्या हेच भाडे ८०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. महाबळेश्वरसाठीही वातानुकूलित स्लीपरचे सध्याचे असलेले एक हजार रुपये भाडे हे १२ ऑगस्टपासून दीड हजार रुपये केले आहे, तर वातानुकूलित आसन असलेल्या बसचे भाडे ८०० ते ९०० रुपये असून एरवी ६०० ते ७०० रुपये भाडे आकारले जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्गला जाण्यासाठीही वातानुकूलित स्लीपर बसचे ७०० ते ८०० रुपये असलेले भाडे १,३०० ते दीड हजार रुपयांपर्यंत आणि विना वातानुकूलित आसनचे ५०० रुपये असलेले भाडेही नंतर एक हजार रुपयांपर्यंत केले आहे.

जे काही शासनाने भाडेवाढीसाठी नियमावली दिली आहे, त्यानुसारच वाढ केलेली आहे. रेल्वेतील सवलती बंद झाल्या, त्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही. मात्र खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी गर्दीच्या काळात भाडेवाढ केल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही भाडेवाढ तात्पुरती आहे. – हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai private bus increased fare between 12 to august 16 to travel tourist destinations zws