मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दुपारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दहिसरच्या दिशेने वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरीदरम्यान वाहनांच्या मोठय़ाच मोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक-प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.पश्चिम द्रुतगती महामार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातही सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. या महामार्गावर अंधेरी ते मानखुर्द ‘मेट्रो २ ब’चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता रोधक (बॅरिकेड्स) लावून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे वाहनांसाठी अनेक ठिकाणी अरुंद रस्ते सध्या वापरात आहेत. त्यामुळे वांद्रे ते दहिसरदरम्यान नेहमीच येथे वाहतूक कोंडी असते. अशात गुरुवारी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. वांद्रे, कलानगर, सांताक्रुझ, वाकोला, अंधेरी दरम्यान वाहनांच्या मोठय़ात मोठय़ा रांगा लागल्या होत्या. एमएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे आणि वाकोला येथे एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान याविषयी एमएमआरडीएला विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on western expressway mumbai news amy