नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातून एका विद्यार्थ्याला निष्कासित करण्यात आले होते. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करून त्याला परीक्षा देऊ देण्याचे तसेच परिसरात प्रवेश करू देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कुलसचिवांना दिले होते. मात्र कुलसचिवांनी न्यायालयीन आदेशाचे पालन न करता विद्यार्थ्यावर प्रवेश बंदी कायम ठेवली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्याचे भविष्य उद्ध्वस्त करू नका, अशा शब्दात कुलसचिवांवर ताशेरे ओढले आणि त्यांच्यावर अवमाननेचा खटला चालविण्याचाही इशारा दिला.
हिंदी विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी निरंजन कुमार याला विद्यापीठाच्या परिसरामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा दिल्यानंतर अनपेक्षितपणे आयआयएम नागपूरचे माजी संचालक भीमराया मेत्री यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचा निषेध करीत विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान बॅनर लावले होते. परिणामी, निरंजन कुमारसह इतर विद्यार्थ्यांना निष्कासित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात निरंजन कुमारने याचिका दाखल केली. न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या निष्कासित करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परंतु, अद्यापही विद्यापीठामध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याचा आरोप निरंजन कुमारने केल्यानंतर न्यायालयाने कुलसचिवांना हजर राहण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. निहालसिंग राठोड यांनी व विद्यापीठातर्फे ॲड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा – नागपूर : शिक्षणापासून वंचित १८० बालकांसाठी उघडणार शाळेची दारे
हेही वाचा – बुलढाण्यात भीषण जलसंकट, लाखो ग्रामस्थांचे हाल; प्रशासनाची अग्निपरीक्षा
सांगा, आदेश कुणी दिला?
वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे डॉ. कथेरिया यांनी न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने तुम्हाला आदेश देणाऱ्या व्यक्तीचे नावा सांगा, नाही तर आम्ही तुमच्यावर अवमाननेचा खटला चालवू असा इशारा दिला. नियमानुसार विद्यार्थ्यावर कारवाई केली असल्याचा युक्तिवाद करत अवमाननेचा खटला दाखल करू नये, अशी विनंती वारंवार कुलसचिवांनी न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने याप्रकरणी मवाळपणा दाखविण्यास नकार देत मंगळवारी सकाळी अवमाननेच्या खटल्यावर निर्णय सुनावणार असल्याचे सांगितले.