नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीच्या (एनटीए) वतीने नीट परीक्षा घेतली जाते. यंदाच्या वर्षी नीट परीक्षा वादात आहे. सुरुवातीला पेपर लीक झाल्याचे आरोप झाले आणि आता अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नीट परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न आले असल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला.

नीट परीक्षेसाठी विद्यार्थी एनसीईआरटीच्या पुस्तकांचे वाचन करतात, मात्र नीट परीक्षेतील काही प्रश्न एनसीईआरटीमधील अभ्यासक्रमाच्या बाहेरील असल्याचा दावा याचिकेत केला होता. यानंतर उच्च न्यायालयाने एनटीएला विचारणा केली होती की नीट परीक्षेसाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांना अधिकृत स्रोत मानायचे की नाही? एनटीएने याप्रकरणी सोमवारी न्यायालयात उत्तर दाखल केले.

हेही वाचा – विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी, पण कधी…

शौरीन आंबटकर या विद्यार्थ्याने याबाबत ३ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अविनाश घरोटे आणि न्या. एम.डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने याप्रकरणात दोन विषय समित्या नेमण्याचे आदेश दिले होते.

दोन्ही समित्यांनी शुक्रवारी न्यायालयात अहवाल सादर केला. नीट परीक्षेत भौतिकशास्त्र विषयातील ‘रेडिओॲक्टिव्ह डिके’बाबत विचारण्यात आलेला प्रश्न अभ्यासक्रमातीलच आहे, असा अहवाल भौतिकशास्त्र विषयातील तज्ज्ञ समितीने दिला. याचिकाकर्त्याने हा अहवाल मान्य केल्याने न्यायालयाने या विषयातील प्रश्नाबाबतची याचिका निकाली काढली. दुसरीकडे, वनस्पतीशास्त्र विषयातील प्रश्न चुकीचा असल्याचा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने केला होता. मात्र वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञ समितीने हा प्रश्न बरोबर असल्याचा दावा केला.

यावर याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला की, संबंधित प्रश्न हा बारावीच्या ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकात नाही. उच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला याबाबत माहिती लिखित स्वरुपात दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘नीट’च्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयातील ‘रेडिओॲक्टिव्ह डिके’बाबत विचारण्यात आलेला प्रश्न क्रमांंक ११ अभ्यासक्रमाबाहेरील होता. याशिवाय वनस्पतीशास्त्र विषयातील प्रश्न क्रमांक १४८ देखील अभ्यासक्रमाबाहेरचा होता, असा दावा करून या प्रश्नाच्या मोबदल्यात याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण प्रदान करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव! काय आहे कारण जाणून घ्या…

विशेष म्हणजे, अशाचप्रकारची एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच फेटाळली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी विद्यार्थ्याचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि एनटीएला स्पष्टीकरण मागितले होते.

काय म्हणाली एनटीए?

एनटीएने सोमवारी दाखल केलेल्या उत्तरात न्यायालयाला सांगितले की नीट ही स्पर्धा परीक्षा आहे. याचा अभ्यासक्रम नॅशनल मेडिकल कमिशनच्यावतीने निश्चित केला जातो. एनटीए केवळ ही परीक्षा घेण्याचे कार्य करते. नीट ही स्पर्धा परीक्षा असल्याने याचा केवळ अभ्यासक्रम सांगितला जातो. यासाठी कोणते विशिष्ट पुस्तक वाचायचे आहे, हे एनटीए कधीही सांगत नाही.