चंद्रपूर: शेतात धान पिकातील निंदन काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली. जनाबाई जनार्धन बागडे (५१) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत सहा नागरिकांना जखमी केले तर, एका बिबट्याने चक्क शेळीवर ताव मारत घरातच ठाण मांडले होते. त्यामुळे तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बुधवारी जनाबाई शेतात धानाचे निंदन करण्यासाठी गेली होती. मात्र, सायंकाळ होवूनही घरी परतली नाही. त्यामुळे कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागला नाही. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. हेही वाचा : “तिसरी आघाडी नाही, तर शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांची आघाडी…” बच्चू कडू म्हणतात… वनविभागाच्या पथकाने गस्त केली. पाऊस सुरू असल्याने शोध लागला नाही. गुरूवारी सकाळी वनविभागाने शोधमोहिम राबविली असता, शेताला लागून असलेल्या कक्ष क्रमांक १३२ मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी महिला शौचालयाला बसल्यानंतर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वनविभागाने तात्काळ कुटूंबियांना २५ हजार रूपये केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मंगळवार २३ जुलै रोजी नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी रस्त्याच्या बाजूच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात दोडकू शेंदरे या शेतकऱ्याचा मृत्यु झाला होता. या भागात सातत्याने वाघांचे हल्ले होत असल्याने ग्रामस्थ भयभित झाले आहे. तेव्हा वन विभागाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. हेही वाचा : अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान; म्हणाले,”माझ्याकडे पेन ड्राईव्ह, हिंमत असेल तर क्लिप…” ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात वाघ व बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाघांच्या हल्ल्यात देखील वाढ झालेली आहे. सध्या शेतकऱ्यांचा हंगाम सुरू आहे. हा संपूर्ण धानाचा पट्टा आहे. त्यामुळे मुसळधार पावसातही शेतकरी पेरणी व धान रावणीच्या कामाला शेतावर जात आहे. अशा स्थितीत शेतात दबा धरून बसलेले वाघ शेतकऱ्यांवर सातत्याने हल्ला करित आहे. वन विभागाने वाघ व बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. महिला देखील पहाटे व रात्रीच्या सुमारास शौचाला जातात. तेव्हा काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.