अमरावती : मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची लाडक्या बहिणींवर दादागिरी सुरू आहे. अजित पवारांच्या महासन्मान यात्रेला उपस्थित राहण्यासाठी महिलांना दमदाटी करण्‍यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या अर्चना मुरूमकर यांनी केला आहे. अजित पवारांच्या यात्रेला उपस्थित न राहिल्यास आशा, स्वयंसेविका, गटप्रवर्तिका तसेच बचत गटांच्या महिलांवर तुमच्यावर कारवाई करू, असे फोन महिलांना जात असल्याचे मुरूमकर यांचे म्‍हणणे आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही १ सप्टेंबर रोजी मोर्शी विधानसभा क्षेत्रात येत आहे. त्यासाठी बचत गटांच्या महिला, आशा अंगणवाडी सेविकांना या महासन्मान यात्रेसाठी उपस्थित राहण्याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून दमदाटी केली जात आहे. महिला सन्मानाचा खोटा आव आणणाऱ्या देवेंद्र भुयारांची सुरू असलेली ही दादागिरी महिला खपून घेणार नसल्याचा इशारा देखील बाजार समितीच्या संचालिका तथा भाजपच्या अर्चना मुरूमकर यांनी देवेंद्र भूयार यांना दिला आहे.

हेही वाचा – फुकटेगिरीत भारतीय सर्वाधिक..! नितीन गडकरींचे बिनधास्त बोल

हेही वाचा – बुलढाणा: युतीत आलबेल, आघाडीत रस्सीखेच; विधानसभा निवडणुकीसाठी…

या संदर्भात अर्चना मुरूमकर यांनी सांगितले की, जनसन्मान यात्रेकरिता अजित पवार मोर्शी मतदारसंघात येणार आहेत. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आशा, स्वयंसेविका, गटप्रवर्तिका, यांना गावागावात जाऊन महिला गोळा कराव्या असे उद्दिष्‍ट देण्यात आले आहे. ज्या महिला काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे फोनवरून त्‍यांना सांगितले जात असल्याचा दावा मुरूमकर यांनी केला आहे. सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याच महिलांना अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहा नाहीतर तुमच्या विरुद्ध कारवाई करू असा इशारा देणे कितपत योग्य आहे. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही महिलांवर अन्याय होणार नाही. यासाठी आम्ही काळजी घेणार आहोत. तसेच महिलांवर दादागिरी करणाऱ्या आमदारांना लोक धडा शिकवतील, असे मुरूमकर यांचे म्‍हणणे आहे. भाजपने आमदार देवेंद्र भुयार यांच्‍या मोर्शी मतदारसंघातील दावेदारीला विरोध सुरू केला आहे. त्‍यातच त्‍यांच्‍यावर हे आरोप करण्‍यात आले आहेत. देवेंद्र भुयार हे राष्‍ट्रवादी अजित पवार गटातील मानले जातात. महायुतीत मोर्शी मतदारसंघ हा त्‍यांच्‍यासाठी मागण्‍यात येणार आहे. त्‍यावरून संघर्ष सुरू झाला आहे. आरोपांसदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही.