वादळी पावसामुळे कुजलेली झाडे, वाकलेल्या झाडांच्या फांद्या वाहनांवर पडतात. हा प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून अशा झाडांच्या फांद्या कापल्या जातात. त्याचा कचरा (तोडलेल्या फांद्या) अनेक दिवस उचलल्या जात नसल्याने अनेकदा त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना तसेच वाहतुकीला होत असल्याचे दिसून आले आहे. वादळी पावसात ही झाडे पडून अपघात होण्याचा धोका संभवतो. हे नुकसान टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार त्याची छाटणी केली जाते. साधारणपणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. पावसाळापूर्व नियोजनात या कामाचा समावेश होतो. राजधानी मुंबईत पावसाळ्यापूर्वी यासाठी सर्वेक्षण केले जाते. उपराजधानी नागपुरमध्येही गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पहिल्या वर्षी सुमारे १०० तर यावर्षी १५ ते २० झाडांची छाटणी करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही ठिकाणी हे काम सुरूच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी वीजवाहिन्यांना अडथळा होत असेल तर झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. मात्र, कापलेल्या फांद्या अनेकदा पदपथावर टाकल्या जातात. अनेक दिवस त्या तशाच पडून असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून येते. प्रामुख्याने प्रतापनगर मुख्य मार्गावर हा प्रकार नेहमी आढळतो. त्यामुळे पादचाऱ्यांना अडचण होते. पदपथाचा वापर ज्येष्ठ नागरिक करत असल्याने त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी त्या रस्त्यावरच पडलेल्या असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होते. पावसामुळे हा कचरा कुजतो. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

सोनेगाव सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर छाटलेल्या फांद्यांचा मोठा ढिग तसाच पडून आहे. नुकत्याच आलेल्या पावसामुळे हा कचरा सडला. त्यामुळे दुर्गंधीही पसरली. तसेच वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे. याच परिसरातील पॅराडाईज सोसायटीत नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या फांद्यांचा अडथळा होत असल्याने उद्यान विभागाचे कर्मचारी त्या फांद्या कापतात. मात्र, त्या उचलण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

बरेचदा झाडांच्या लहान फांद्या उचलायच्या राहून जातात –

“झुकलेल्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी कापल्या जातात. मागील वर्षी अशा सुमारे १०० झाडांच्या तर यावर्षी देखील १५-२० झाडांची छाटणी करण्यात आली. त्यासोबतच पावसाळ्यात झाडे पडतात ते उचलून रस्ता मोकळा केला जातो. पण, बरेचदा झाडांच्या लहान फांद्या उचलायच्या राहून जातात.” असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांनी सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur garbage of cut branches on footpath delayed pick up health implications too msr