Premium

नागपूरचे ‘व्हीएनआयटी’ विशिष्ट विचारधारेच्या प्रचार-प्रसाराचे केंद्र! जाणून घ्या काय घडले असे…

केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशातील शिक्षण संस्थांवर उजव्या विचाराच्या संस्थेतील वेगवेगळ्या शाखांनी आपली पकड मजबूत करणे सुरू केले आहे.

VNIT

देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जागतिक दर्जाचे संशोधन, १०० टक्के नोकरीची हमी आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी देशभर प्रसिद्ध असलेली मध्यभारतातील नामवंत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘व्हीएनआयटी’ हल्ली केंद्र सरकारला हितकारक अशा विशिष्ट विचारधारेच्या प्रचार-प्रसाराची जणू केंद्र झाली आहे. तथ्य आणि सूत्रांच्या आधारावर जागतिक दर्जाचे संशोधन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये संशोधन सोडून ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अमंग्स्ट यूथ’ (स्पिक मॅके) या अशासकीय संस्थेच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारतीय संगीत आणि नृत्याचा कलाविष्कारातून संस्कृती उत्थानाचे धडे दिले जात आहेत.

केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशातील शिक्षण संस्थांवर उजव्या विचाराच्या संस्थेतील वेगवेगळ्या शाखांनी आपली पकड मजबूत करणे सुरू केले आहे. विविध कार्यक्रम, अभ्यासक्रमातील हस्तक्षेप असे प्रकार सर्रास सुरू आहेत. असेच काहीसे चित्र ‘व्हीएनआयटी’तही पहायला मिळत आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या तंत्रशिक्षण संस्थेतील अनेकांनी जगभरात नावलौकिक मिळवला. संस्थेचा शैक्षणिक आणि संशोधनाचा दर्जा आजही कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे शिक्षण आणि संशोधनासह विशिष्ट विचारांनी प्रेरित संस्थांच्या कार्यक्रमातून ‘पुराणातील वांगी’ शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी नेता कटकम सुदर्शनचा मृत्यू

 ‘स्पिक मॅके’ ही संस्था भारतीय संगीत, नृत्य अशा लोककलांसह संस्कृती संवर्धनासाठी जागतिक पातळीवर काम करते. संस्थेचे काम देशभरात व्यापलेले आहे. मात्र, तथ्याच्या आधारावर संशोधनाचे धडे देणाऱ्या संस्थेमध्ये संगीत, नृत्य अशा कार्यक्रमांमधून संस्कृती रक्षणाचे धडे ‘स्पिक मॅके’च्या अधिवेशनातून दिले जात आहेत. या अधिवेशनासाठी वसतिगृह, सभागृह आणि अन्य सर्व सुविधा ‘व्हीएनआयटी’कडून पुरवल्या जात आहेत. उजव्या विचारांच्या संघटनांकडून अशाप्रकारे राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थांचा वापर विशिष्ट विचारांची पेरणी करण्यासाठी होत असल्याने जाणकारांकडून याला विरोध होत आहे.

‘व्हीनआयटी’मधील कार्यक्रमांचा इतिहास

भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१६ ला ‘व्हीएनआयटी’मध्ये ‘पुनरुत्थानासाठी संशोधन’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिसंवादास ‘ज्ञानयज्ञ’, शोधनिबंध सादरीकरणास ‘समिधा’ तर बीजभाषणास ‘आहुती’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर अलीकडेच भारतीय शिक्षण मंच तसेच रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशन-आरएफआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शैक्षणिक नेतृत्व’ परिषद घेण्यात आली. यावेळी संशोधन आणि विज्ञानवादाला फाटा देत विशिष्ट विचारांची पेरणी करण्याचेच काम केले गेले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी संगीत, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘स्पिक मॅके’चे अधिवेशन विविध संस्थांनी प्रायोजित केले आहे. – डॉ. प्रमोद पडोळे, संचालक, व्हीएनआयटी नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 11:08 IST
Next Story
गडचिरोली : ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी नेता कटकम सुदर्शनचा मृत्यू