वर्धा : जिल्ह्यात चार विधानसभा व एक विधान परिषद आमदार आणि एक मंत्री भाजपचे आहे. त्यामुळे कोण पुढे अशी अक्षरशः स्पर्धा सुरू आहे. त्यात मंत्री डॉ. पंकज राजेश भोयर व आमदार सुमित वानखेडे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटस्थ. आमचे काय, असा सवाल आणि तुलना जाहीरपणे सुरू झाली आहे. मुख्यत: सुमित वानखेडे यांच्या कामाची स्पीड अन्य मतदारसंघात चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रामुख्याने हिंगणघाट मतदारसंघातील नागरिक व विरोधी पक्ष सतत आव्हान देत आहे. शिवसेना ठाकरे गटाने तर जाहीर विचारणा केली. नेते
सतीश धोबे म्हणतात की, फक्त घोषणा करणारा आमदार भेटला. मेडिकल कॉलेज, रुग्णालय, एमआयडीसी, क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन व अन्य योजना जाहीर झाल्या. पण अद्याप कुठेच निधी आलेला नाही. आजनसारा बॅरेज तसेच प्रलंबित. हे लोकप्रतिनिधीचे अपयश नव्हे का? हिंगणघाटकडेच दुर्लक्ष का? सगळे फक्त कागदावर का? असे लेखी निवेदन प्रसारित होत आहेत. विदर्भातील सर्वात मोठा तालुका असलेल्या व दीड लाखावार शहर लोकसंख्या असलेल्या हिंगणघाटात एकही मोठा उद्योग नाही.

दुसरीकडे अभ्यासू वृत्तीचे व शिक्षित आमदार सुमित वानखेडे आर्वीत सर्व क्षेत्र सुजलाम सुफलाम करीत आहे. कमी वेळात सतत पाठपुरावा करीत ते यशस्वी होत आहे. हिंगणघाट येथे फक्त कागदी घोडे नाचतात, असा आरोप मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर व अक्षय बेलेकर रुग्णालय संदर्भ देत करतात.

आरोपात घेरलेले आमदार समीर कुणावार या संदर्भात ‘लोकसत्ता’सोबत बोलताना प्रथम टोला हाणत म्हणतात की, माझे विरोधक पालिका राजकारण मानसिकतेत आरोप करतात. त्यांनी समजून घेतले पाहिजे की योजना मंजूर म्हणजे निधी येणारच. सांस्कृतिक भवन निधी पालिकेकडे आला आहे. आजनसरासाठी दीडशे कोटी आले, रुग्णालय टेंडर निघाले आहे. औद्योगिक वसाहत जागा तिढा सुटणार. खरे तर ते याच गावातील आहे. त्यांनी जाहीर विचारणा करू नये. चहा पाण्यास घरी यावे व सर्व समजून घ्यावे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल. सुमित वानखेडे व माझी तुलना व्यर्थ आहे. कामे व निधी कोणती व किती हे समजून घेतल्यास आम्ही हिंगणघाटकर किती तरी पुढे आहोत. मी हिंगणघाटसाठी किती निधी आणला, हे लेखी स्वरूपात वाचण्याचे कष्ट माझे विरोधक घेतील कां ? असा सवाल आमदार कुणावार करतात व उत्तर देण्यास खुला असल्याचे स्पष्ट करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer kunawar sumit wankhede voters ask mla wardha pmd 64 ssb