नागपूर : आधी करोना व नंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात वाढीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळनाने उत्पन्न वाढीसाठी क्लृप्ती शोधली आहे. त्यानुसार उत्पन्न वाढवणाऱ्या चालक- वाहकांना रोखीने प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर हा या योजनेसाठीचा कालावधी ठरवण्यात आला आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करताना आधी प्रत्येक फेरीतील महसुलाचा मूळ आकडा निश्चित करावा लागेल. यासाठी सप्टेंबर २०२३मधील सर्व दिवसांचे निव्वळ वाहतूक उत्पन्न (वाहकाने विक्री केलेल्या तिकिटांचे उत्पन्न) विचारात घेतले जाईल.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी करणार राज्यातील ‘या’ एकमेव प्रकल्पाची पायाभरणी

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढून प्रवाशांना चांगल्या सेवा मिळाव्या म्हणून चालक- वाहकांच्या प्रोत्साहनासाठी ही योजना आणली आहे. त्यातून महामंडळाचा महसूल वाढेल असा विश्वास आहे.

श्रीकांत गभणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एसटी महामंडळ, नागपूर.

हेही वाचा : भाजप नेत्याचे स्वपक्षालाच आव्हान! म्हणाले, “उमेदवारी मिळाली नाही तरी…”

..तर प्रोत्साहन भत्ता नाही

प्रोत्साहन भत्त्यासाठी ठरलेल्या कालावधीत चालक/ वाहकाविरुद्ध प्रवाशांशी गैरवर्तनाची तक्रार आल्यास व दोष सिद्ध झाल्यास, कर्तव्यावर असताना अनुचित पद्धतीने उत्पनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास, सवलतधारी अथवा इतर प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाकारल्याचे आढळल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही.