technical glitches in application process for police recruitment zws 70 | Loksatta

पोलीस भरतीत तांत्रिक गोंधळ; उमेदवारांची तारांबळ; ऑनलाइन शुल्क भरल्यानंतरही नोंद नाही

महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार ८३१ पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस भरतीत तांत्रिक गोंधळ; उमेदवारांची तारांबळ; ऑनलाइन शुल्क भरल्यानंतरही नोंद नाही
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

देवेश गोंडाणे, लोकसत्ता  

नागपूर : महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत सुरू असलेल्या पोलीस शिपाई आणि चालक पदभरतीच्या अर्जप्रक्रियेमध्ये तांत्रिक गोंधळ सुरू असल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडत आहे. सर्वच स्तरातून या भरतीप्रक्रियेतील गोंधळावर टीका होत असल्याने १५ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळ कायमच आहे. उमेदवारांनी अर्जासोबत लागणारे शुल्क ऑनलाइन भरल्यानंतरही  ते जमा झालेले दिसत नाही. दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा होत आहेत. या सर्व गोंधळात अर्ज अपूर्ण राहत असल्याने चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार ८३१ पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंत वेळ देण्यात आल होता. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिले असताना संकेतस्थळ बंद पडणे, शुल्क भरताना येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे  अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह काही लोकप्रतिनिधींनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर तत्काळ निर्णय घेत फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, परंतु अर्ज भरताना संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी मात्र कायम आहेत. त्यामुळे अर्ज अपुरा किंवा चुकीचा भरल्या गेल्यास आपण भरतीप्रक्रियेला मुकणार, अशी भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्ज अपूर्ण राहण्याची चिंता

संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने रात्रभर जागून उमेदवार अर्ज भरत असल्याची माहिती आहे. यामुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. शुल्क ऑनलाइन भरल्यानंतरही अर्जासोबत ते जमा झालेले दिसत नाही. दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा होत आहेत. या सर्व गोंधळात अर्ज अपूर्ण राहत आहे.

दुसऱ्याच ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर

पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येईल, असा नियम आहे. हा नियम पाळला जावा म्हणून उमेदवारांना अर्ज भरताना त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आणि आधार क्रमांक द्यायचा आहे. यावरही काही उमेदवारांनी शक्कल लढवली आहे. ते इतर जिल्ह्यातूनही अर्ज भरता यावा म्हणून दुसरा ई-मेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक वापरून अर्ज करीत आहेत. त्यांचे अर्ज आणि शुल्कही स्वीकारले जात असल्याने अन्य उमेदवार आक्षेप घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 02:40 IST
Next Story
नागपूर: फडणवीस यांनी शब्द पाळला, राज्यातील ३५ हजार अधिसंख्य कर्मचाऱ्यांना दिलासा