जळगाव – शहरातील जळगाव जिल्हा सहकारी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात रविवारी सकाळी एका विद्यार्थ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सतीश बाविस्कर (२०, रा. शिव कॉलनी, जळगाव) हा जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेच्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी पहाटे मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाच्या न कळत त्याने महाविद्यालयाच्या पूर्वेकडील संरक्षण भिंतीवरून आवारात उडी घेतली. त्यानंतर दुचाकी वाहनतळाच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. रविवारी महाविद्यालयास सुटी असल्याने आपल्या आत्महत्येबद्दल कोणाला लवकर काही कळणार नाही, असा अंदाज बहुधा त्याने बांधला असावा. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी इन्टाग्रामवर आपण प्रेमभंगातून स्वतःला संपवत असल्याचा संदेश त्याने आधीच टाकला होता, असे त्याच्या वर्गमित्रांकडून सांगण्यात आले.

सतीश बाविस्करने आवारातील झाडाला गळफास घेतल्याची माहिती लगेच नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रशासनाला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तिथे तातडीने पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student commits suicide in nutan maratha college premises in jalgaon ssb