onion-rates-will-hike-after Diwali-impacted-due-to-heavy-rains | Loksatta

कांदा रडवणार? दिवाळीनंतर कांदा महागण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसणार आहे . त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे.

कांदा रडवणार? दिवाळीनंतर कांदा महागण्याची शक्यता
दिवाळीनंतर कांदा महागण्याची शक्यता

यंदा कांद्याने दिलासा दिला असला तरी सध्याच्या मुसळधार पावसाने नवीन कांद्याला झळ बसत आहे तर दुसरीकडे जुना कांदा ही भिजल्याने खराब होत आहे . एपीएमसीत कर्नाटक हुबळी येथील नवीन कांद्याची आवक ही पूर्णपणे थांबली आहे. तसेच जुना कांदा खराब होत असून नवीन कांदा उत्पादनाला एक ते दीड महिना विलंब होणार आहे . त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. परिणामी कांद्याची दरवाढ होईल, असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : चक्क संरक्षक भिंत तोडून फेरीवाल्यांनी मांडले बस्तान

मागील दोन ते तीन वर्षांपासून ऐन नवीन लाल कांद्याच्या हंगामात अतिवृष्टी, पाऊस लांबल्याने कांदा पिकाचे नुकसान होत आहे. पावसाने पिकाला झळ बसत असून उत्पादनात घट होत आहे. कांद्याचे मुख्यत्वे दोन हंगाम आहेत. एक जुना कांदा आणि नवीन कांदा. जुन्या कांद्याचा हंगाम हा फेब्रुवारी-मार्च तर नवीन कांद्याचा हंगाम हा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. जुना कांद्याचा हंगाम हा ८ ते ९ महिने तर नवीन कांद्याचा हंगाम हा २ ते ३ महिने असतो.

हेही वाचा- नवी मुंबईकरांसाठी शुभवार्ता.. यंदाही मोरबे धरण १०० टक्के भरणार…

दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची शक्यता

दरवर्षी पावसाळा सुरू होताच कांद्याचे दर वधारतात. मात्र, यावर्षी आद्यप तरी कांद्याने दिलासा दिला आहे. यंदा उष्म्याने खराब होत आलेले साठवणुकीचे कांदे मुसळधार पावसाने भिजल्याने आणखी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात ८०% कांदा हलक्या दर्जाचा तर २० टक्के उच्चतम दर्जाचा येत आहे. ऑगस्टमध्ये बाजारात कर्नाटक हुबळी येथील नवीन कांद्याची आवक होण्यास सुरुवात होते. मात्र, त्या ठिकाणीही कांद्याचा तुटवडा भासत असल्याने बाजारात सध्या हुबळी येथील नवीन कांदा दाखल होत नाही. तसेच सध्याच्या मुसळधार पावसाने राज्यातील नवीन कांद्याच्या पिकावर ही परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील नवीन कांदा दाखल होण्यासाठी आणखीन एक ते दीड महिना लागणार आहे . त्यातही पावसामुळे नवीन करण्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे . तसेच जुना कांदाही मोठ्या प्रमाणावर खराब होण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असून परिणामी कांद्याची दरवाढ होईल, असे मत घाऊक व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीमुळे ही नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका

आतापर्यंत कांद्याचे दर अवाक्यात आहेत . परंतु सध्या बाजारात जुना कांदा दाखल होत असला तरी त्यामध्येही ८० टक्के कांदा हलक्या दर्जाचा तर २० टक्के कांदा उत्तम दर्जाचा येत आहे. अतिवृष्टीमुळे ही नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसणार आहे . त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता असल्याचे मत एपीएमसीमधील कांद्याचे घाऊक व्यापारी महादेव राऊत यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2022 at 11:18 IST
Next Story
रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी महिलेच्या खूनातील रहस्य उलगडले ; पती व त्याच्या प्रेयसीने दिली होती सुपारी