कुतूहल : मांजरीचे डोळे आणि पथनिर्देशक

आपल्याला दिसण्यासाठी जेवढा प्रकाश आवश्यक असतो त्यापेक्षा एकषष्ठमांश प्रकाशात मांजर पाहू शकते.

cat eye street light
रस्त्यावर लुकलुकणारे छोटे दिवे

हेडलाइट्सच्या झोतात रस्त्यावर लुकलुकणारे छोटे दिवे ‘मांजरीचे डोळे’ (कॅट्स आइज) या नावाने ओळखले जातात. ब्रिटिश शास्त्रज्ञ पर्सी शॉ यांना एका रात्री गाडी चालवत असताना अंधारात चमकणारे मांजरीचे डोळे दिसले आणि ही कल्पना सुचली. मांजर अंधारातही चांगले पाहू शकते. आपल्याला दिसण्यासाठी जेवढा प्रकाश आवश्यक असतो त्यापेक्षा एकषष्ठमांश प्रकाशात मांजर पाहू शकते. याचे कारण मांजराच्या डोळय़ातील पडद्यामागे असणारा टेपेटम ल्युसिडम नावाचा स्तर. हा स्तर एखाद्या आरशाप्रमाणे काम करतो. डोळय़ात शिरणारे प्रकाशकिरण या स्तरावरून परावर्तित होऊन परत पडद्यावर पडतात. म्हणजेच एकच प्रकाशकिरण पडद्यावर दोनदा पडतो. त्यामुळे मांजर अतिशय कमी प्रकाशातही पाहू शकते. टेपेटम ल्युसिडमवरून परावर्तित होणारे काही प्रकाशकिरण डोळय़ाबाहेर येतात आणि आपल्याला डोळा चमकताना दिसतो.

यावरून कल्पना सुचून पथनिर्देशक तयार केले गेले. ते रस्त्यावर लावले जात असल्याने त्यांची वजन सहन करण्याची क्षमता जास्त असावी लागते आणि ते मांजरीच्या डोळय़ांपेक्षा वेगळय़ा प्रकारे काम करतात. रबर, प्लास्टिक किंवा धातूच्या पत्र्यात अंतर्गोलाकार खोबणीत बसविलेले, किंचित गोलाकार पृष्ठभाग असलेले अणि दोनपेक्षा जास्त अपवर्तनांक असलेले पारदर्शक तुकडे असे त्यांचे स्वरूप असते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पथनिर्देशकांसाठी धातू तर रस्त्याच्या कडेला असलेल्या पथनिर्देशाकात प्लास्टिक वापरतात. या निर्देशकांचे मुख्य वैशिष्टय़ हे की, परावर्तन व अपवर्तन या दोन्हींच्या एकत्रित उपयोगामुळे पडणारा प्रकाश ज्या दिशेने येतो त्याच दिशेला परावर्तित होतो. त्यामुळे वाहनाच्या दिव्याचा प्रकाश त्यांच्यावर पडला, की वाहनचालकाला हे निर्देशक नेहमी उजळलेले दिसतात. मुसळधार पावसाळी रात्री अथवा दाट धुक्यातही चालकाला पुढचा रस्ता नीट कळतो. वळणे कोपरे समजतात. आणि अपघात टाळण्यास मदत होते. रस्त्याच्या मार्गिका (लेन) दर्शविण्यासाठीही यांचा उपयोग करतात. त्यामुळे गाडी मार्गिका ओलांडत असेल तरीही चालकाच्या लगेच लक्षात येते.

जगभर वेगवेगळय़ा रंगांचे परावर्तक वापरतात. परंतु भारतात लाल, पिवळय़ा व पांढऱ्या रंगांचा वापर होतो. लाल व पिवळा रंग मार्गिका न ओलांडण्याची सूचना देतात, पांढरा रंग रस्त्याचा मध्य दर्शवतो. अलीकडे पथनिर्देशकांत एलईडी दिव्यांचाही वापर होतो. हे दिवे दिवसा सूर्यप्रकाशात मिळणारी ऊर्जा साठवून रात्री प्रकाश देतात. यातून मिळणारा प्रकाश जास्त प्रखर असतो आणि तो दूरवरून दिसतो, परंतु हे महाग असतात.

– डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Percy shaw inventor of cat eye street light zws

Next Story
भाषासूत्र : कुठले कपडे घालावे, काय नेसावे?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी