पालघर : राज्य परिवहन महामंडळाच्या सफाळे आगारात नुकत्याच पाच नवीन बस दाखल झाल्या असून गेल्या सहा महिन्यामध्ये पालघर विभागात आतापर्यंत बीएस६ प्रणालीच्या ५० नवीन बस दाखल झाल्या आहेत. पालघर विभागाची १२० बसची मागणी असून वर्षभरात मागणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाच्या आठही आगारांकरिता प्रत्येकी १० नवीन बसची मागणी करण्यात आली आहे. पालघर विभागाला नवीन बस गाड्यांची आवश्यकता असल्याने पालघर विभागातील पालघर, सफाळे, डहाणू, नालासोपारा, अर्नाळा, जव्हार, बोईसर, वसई या आठही आगारांना नवीन १० गाड्या देणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर दौऱ्यादरम्यान जाहीर केले होते.

पालघर विभागातल्या १५ वर्षापासून कार्यरत असलेल्या २९ बस एप्रिल महिन्यात कालबाह्य करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवीन दाखल होत असलेल्या या गाड्या लांब पल्ल्यासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे कालबाह्य झालेल्या बसची जागा नवीन गाड्यांनी भरून काढली आहे. जुन्या गाड्यांप्रमाणे नवीन गाड्या या वारंवार खराब होणार नसल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याचा अंदाज एसटी प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.

सफाळे आगारात पाच बस दाखल

सफाळे आगारात नव्याने दाखल झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे उद्घाटन आमदार विलास तरे यांच्या हस्ते २८ जून रोजी पार पडले. या बस सफाळे–जळगाव, सफाळे–पाचोरा आणि सफाळे–शिर्डी अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. आणखी पाच बसेस मिळविण्याचा प्रस्ताव आगारामार्फत सादर करण्यात आला आहे त्या लवकरच मिळतील, असा विश्वास सफाळे आगारप्रमुखांनी व्यक्त केला आहे. अलीकडच्या काळात पालघर रेल्वे सेवेतील अडथळ्यांमुळे प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, सफाळे–पालघर आणि सफाळे–जलसार जेट्टी या मार्गांवर लालपरीने प्रवाशांना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे या नव्या बसेसच्या आगमनाने प्रवाश्यांमध्ये दिलासा मिळाला आहे.

सफाळे आगारात नव्याने मिळालेल्या या बसेसचा लाभ प्रामुख्याने आदिवासी भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, उदरनिर्वाहासाठी येणारे चाकरमानी, वयोवृद्ध नागरिक, महिला भगिनी यांना होणार आहे. या माध्यमातून त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर व वेळबद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. –विलास तरे, आमदार

पालघर विभागातील काही गाड्या नुकत्याच कालबाह्य झाल्या आहेत. तसेच एकूण १२० गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. नवीन गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कैलास पाटील, विभाग नियंत्रक

आतापर्यंतच्या दाखल झालेल्या बस

पालघर – १०

जव्हार – १०

सफाळे – ५

वसई – ५

अर्नाळा – ५

डहाणू – ५

बोईसर – ५

नाला सोपारा – ५

एकूण – ५०