पालघर : पालघर जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला यात्रास्थळ विकासनिधी प्राप्त झालेला आहे. मात्र त्याचे वाटप करताना सदस्यांना दूर ठेवले असून जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये वाटला गेला आहे. या प्रकाराने सदस्य वर्गाने नाराजी व्यक्त करत हा गैरप्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कामे मंजुरीसाठी येणार असून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या तीर्थ व यात्रास्थळांवर भौतिक सुविधा तसेच इतर सुविधा निर्माण करण्यासाठी  साडेतीन कोटींच्या जवळपासचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीचे व्यवस्थित नियोजन करणे अपेक्षित असताना काही ठरावीक पदाधिकाऱ्यांनी बहुतांश निधी स्वत:जवळ ठेवल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक एक कोटी २० लाख रुपयांच्या जवळपासची कामे ही बांधकाम समिती सभापती यांनीच सुचवलेली आहेत व ती मिळवली आहेत. त्याखालोखाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ७० लाख रुपयांची कामे सुचवली आहेत आणि ती मंजूरही करण्यात आली आहेत.  उर्वरित निधीची कामे इतर सदस्यांना मंजूर करण्यात आली आहेत. त्यातही बहुतांश कामे ही बांधकाम समितीच्या सदस्यांची आहेत. समितीच्या सात सदस्यांना ही कामे दिली आहेत. तर सर्वसामान्य चार सदस्यांचीच कामे मंजूर केली आहेत. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांची २७ लाख रुपयांची कामे मंजूर केली गेली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या एका कार्यालयात बसून बांधकाम सभापती उपाध्यक्ष व अध्यक्ष यांनी तिघांनी मिळून ही कामे सदस्यांना विश्वासात न घेता मंजूर केल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता सदस्य वर्ग वर्तवत आहेत. या कामांना सर्वसाधारण सभेत विरोध करून तो रद्द करायला भाग पाडू असेही एका सदस्याने म्हटले आहे. पालघर जिल्हा परिषदेमध्ये ५७ सदस्य आहेत. आलेला निधी याचे नियोजन करून समसमान वाटप करणे आवश्यक असताना हा दुजाभाव केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allocation of development funds among the chief office bearers of palghar zilla parishad zws
First published on: 18-08-2022 at 00:53 IST