पालघर: पालघर जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यातून सात तसेच समूह बुकिंग पूर्ण झालं आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्यासाठी दोन जुलै पूर्वी आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर राज्य परिवहन महा मंडळा मार्फत भाविकांच्या सेवेसाठी ५५ बसेस मार्फत पंढरीची वारी घडवून आणणार आहे. २ जुलैपासून पंढरपूरला जाण्याकरिता बस पाठविण्यात येणार असून याकरिता आगाऊ समूह बुकिंग सुरू करण्यात आले आहे. वसई येथून सहा समूह व नालासोपारा येथून एका बसचे असे एकूण ७ बसेस चे समूह बुकिंग झालेले असून पालघर तालुक्यातील केळवा, माहीम, सातपाटी, शिरगाव, खारेकुरण व इतर गावातून देखील पंढरपूर करता ग्रुप बुकिंग उपलब्ध आहे. तरी ग्रामस्थानी आगार व्यवस्थापक यांचेशी संपर्क करून ग्रुप बुकिंग करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

ज्या गावातून मागणी येईल त्या गावातून थेट बसेस पंढरपूर येथे सोडण्यात येणार आहेत. या बसेस ला महिला सन्मान योजनेची सवलत लागू आहे. तसेच ७५ वर्षांवरील प्रवाश्यांना मोफत सवलत लागू आहे. तसेच ६५ वर्ष ते ७५ वर्षे प्रवाश्यांना जेष्ठ नागरिकांची सवलती लागू असून सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा व ग्रुप बुकिंग करून घेण्यात यावे. तसेच परतीचे देखील ग्रुप बुकिंग सुरू असल्याचे पालघर आगार प्रमुख सुजित घोरपडे यांनी सांगितले.

एसटीचे नियोजन

एसटी प्रशासन कमी उत्पन्न येणाऱ्या बस फेऱ्या काही कालावधीसाठी रद्द करून त्या पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारांमध्ये बसचे नियोजन करण्यात येत आहे.

तिकीट दर पालघर ते पंढरपूर

विना सवलत- ८०५

महिला सन्मान योजना -४०३

जेष्ठ नागरिक -४०३

अमृत जेष्ठ नागरिक -मोफत