तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका स्थानिक भाषेसह दोन भाषांत देण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना इंग्रजी भाषा न येण्याचा अडथळा यामुळे राहणार नसून, समजलेल्या गोष्टी उत्तरांत नेमकेपणाने मांडण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

हेही वाचा >>> पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

या संदर्भातील परिपत्रक ‘एआयसीटीई’ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. भारतीय भाषांतून तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एआयसीटीई’कडून अभियांत्रिकी पदवीपूर्व आणि पदविका अभ्यासक्रमांना जागा वाढवून दिल्या जात आहेत. भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतल्याचा वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो, असे ‘एआयसीईटी’ने नमूद केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसते. भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतल्यामुळे भाषा हा ज्ञान आणि कौशल्यात अडथळा ठरणार नाही. भाषेवरील प्रभुत्वाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर लक्षणीय परिणाम होतो. भारतीय भाषांत प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्यामुळे प्रश्नाचा मूळ उद्देश समजून घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर लिहिणे शक्य होईल.

हेही वाचा >>> “मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार”, वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना विश्वास

अनेकदा इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्यात अडचण येत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रश्नपत्रिकेत आता स्थानिक भाषेत प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना सहजपणे समजून घेऊन त्यानुसार परिणामकारक पद्धतीने उत्तर देता येईल. विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीत सुधारणा होईल. भारतीय भाषा ही कोणत्याही व्यक्तीची सांस्कृतिक ओळख असते. स्थानिक भाषेत परीक्षा घेतल्यामुळे त्या भाषेचे जतन आणि प्रचार होण्यास मदत होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण प्रवेश गुणोत्तर वाढण्यास मदत पदवीस्तरावर अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांत स्थानिक भाषेचा स्वीकार केल्यास पदवी अभ्यासक्रमांच्या पटनोंदणीतही वाढ होईल, अशी केंद्र सरकारला आशा आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.