पुणे : क्रेडाई राष्ट्रीयच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण २०२२’ नुसार बांधकाम व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि घरांच्या किमतीत १० ते ३० टक्के इतकी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.  याबरोबरच नजीकच्या काळात या किमती वाढत्याच राहतील असे मत ९० टक्के बांधकाम विकसकांनी व्यक्त केले आहे. दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू चेन्नई, हैदराबाद, कलकत्ता, मुंबई विभाग आणि पुणे या शहरांसह २१ राज्यांमधील विकसकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये शंभराहून अधिक विकसक सदस्य पुण्यातील होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले,की टाळेबंदीच्या काळात पुण्यातील बांधकाम विकासकांनी सहकार्य आणि सहयोगाची भूमिका घेतली. आता कुठे हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना स्टील, सिमेंट आणि इतर आवश्यक साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे बांधकाम खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. भविष्यातील वाढ बांधकाम विकसकांना परवडणारी नाही.

या वाढीमुळे जवळपास १० ते ३० टक्के किमतीत वाढ होणार असून, त्यामुळे विकासकांबरोबरच घर खरेदी करणाऱ्यांवरही मोठा ताण पडणार आहे. प्रकल्पांसाठी जलद मंजुरी, वस्तू आणि सेवा करावर (जीएसटी) क्रेडिट इनपुट सादर करणे आणि निधीची उपलब्धता वाढवणे याशिवाय वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा करत आहोत.’’

या सर्वेक्षणानुसार पुण्यात सुमारे ९९ टक्के सदस्य विकसक हे २०२२ मध्ये नवीन प्रकल्प सादर करण्याची योजना आखत आहेत. तर, ३८ टक्के विकसक याबाबतीत सकारात्मक आहेत. ७२ टक्के सदस्य हे ऑनलाईन विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि ६५ टक्के विकसक हे निवासी प्रकल्पांची योजना आखत आहेत. एकूण ७२ टक्के सदस्य बांधकाम क्षेत्रातील नवीन व्यवसाय शोधण्याच्या तयारीत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction sector prices likely to rise by 10 to 30 percent zws