पुणे : प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेत शनिवारी (१६ जुलै) प्रख्यात नृत्यांगना-अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई यांचे व्याख्यान होणार आहे. ‘ब्रेकिंग सिलोस’ अर्थात ‘कप्पेबंदी तोडताना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ऑनलाइन पद्धतीने सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार असून, https://youtu.be/nlaoAkoKweg या लिंकद्वारे व्याख्यान ऐकता येणार आहे.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम बापट यांच्याविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून साहित्य आणि नाट्यकर्मी मकरंद साठे व गजानन परांजपे यांनी २०१३ मध्ये प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमाला सुरू केली. समाज, राजकारण आणि कलात्मक सर्जन या तीन विषयांबद्दल प्रा. बापट यांना विशेष आस्था होती. त्यांनी या तीन घटकांकडे कधीच कप्पेबंद पद्धतीने पाहिले नाही. या व्याख्यान मालिकेतील वक्ते या तीन घटकांबद्दलच आपले विचार एकत्रितपणे मांडणार आहेत.