पुणे :  कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधील बारडोलीतून अटक केली. आरोपी गेल्या बारा वर्षांपासून स्वतःचे नाव बदलून गुजरातमध्ये वास्तव्य करत होता.

रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल (वय ४५, रा. बारडोली जि. सुरत, गुजरात. मुळ रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यतील फरार आरोपी वहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट बजावले होते त्याचा ठावठिकाणा न लागल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते. 

हेही वाचा >>> विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे आणि पथकाने वानवडी परिसरात त्याचा शोध घेतला. त्याचे नातेवाईक, मित्रांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, पोलसांना काही माहिती मिळाली नाही. आरोपी वहिम पटेल नाव बदलून  गुजरातमघील बारडोली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने १३ वर्षांपूर्वीचे पटेलचे छायाचित्रन मिळवले. पोलिसांच्या पथकाने बारडोली परिसरात त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो  १२ वर्षापासून पोलिसांच्या अटकेला घाबरून स्वत:चे नाव बदलून वास्तव्य करत असल्याचे त्याने सांगितले. पटेलला वानवडी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांनी ही कामगिरी केली.