महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला असे कळसकरने सीबीआयने केलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर सुद्धा अटकेत आहेत. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मागच्यावर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. सीबीआयने २५ मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली.

फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सुर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkar murder case sharad kasalkar sachin andure cbi report dmp