पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यभागातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नुकतेच दिले. त्यानुसार मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिला.
उत्सवाच्या काळात खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बैठकीत नुकतीच केली होती. त्यानंतर मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पाठविला. जिल्हाधिकारी दिवसे यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले. गणेशोत्सवात मध्यभागातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी विनंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. पोलीस आयुक्तांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेली सूचना विचारात घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर गणेशोत्सवात मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी नमूद केले.
शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने, मद्यालये ही संपूर्ण गणेशोत्सव काळात बंद राहणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार आहे. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने, मद्यालये विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी (११ आणि १३ सप्टेंबर) गणेश विसर्जन होणाऱ्या परिसरातील मिरवणूक मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
उत्सवाचे पावित्र्य प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. आदेशाचा भंग करून कोणी मद्यविक्री करत असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी मद्यविक्री बंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करावी. – प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, पुणे पोलीस