Windy weather affects fruits Arrival grapes delayed two months ysh 95 | Loksatta

लहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर

लहरी हवामानामुळे यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

लहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

दत्ता जाधव

पुणे : लहरी हवामानामुळे यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही पूर्वहंगामी (अगाप) छाटण्या झाललेल्या नाहीत. त्यामुळे पुरेशी गोड द्राक्षे बाजारात येण्यास फेब्रुवारअखेर उजाडणार आहे.

  नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसरात पूर्वहंगामी छाटण्या होतात. सध्या तेथील द्राक्षांची वाढ शेंगदाण्याइतकी झाली आहे. ही द्राक्षे गोड नसतात, त्यांना खासकरून दक्षिण भारतात मागणी असते. या द्राक्षांची विक्री राज्यात अल्प प्रमाणात मॉलमधून होते. नाशिकच्या पूर्वहंगामी छाटण्या वगळता, ऑगस्ट महिन्यात इंदापूर, तुळजापूर आणि तासगावच्या पूर्व भागात फळ छाटणी होते. सप्टेंबर अखेपर्यंत राज्यातील सरासरी तीस टक्के द्राक्षबागाची छाटणी झालेली असते. पण, मागील दोन-तीन हंगामांत फटका बसल्यामुळे आणि यंदा पावसाचा जोर कायम असल्यामुळे आजअखेर द्राक्ष बागायतदार छाटणी करण्यास धजावताना दिसत नाहीत. फळ छाटणी झाल्यानंतर चार महिन्यांनंतर द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होते. यंदा ऑगस्ट महिन्यात छाटण्या झाल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरअखेर बाजारात होणारी द्राक्षांची आवक यंदा होणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून राज्यात फळ छाटण्यांना वेग येईल आणि ही द्राक्षे जानेवारीअखेरीस बाजारात येतील.

विक्री व्यवस्था कोलमडून पडणार 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरअखेपर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यात द्राक्ष हंगाम सुरू व्हायचा. त्यामुळे बाजारातही ठरावीक अंतराने द्राक्षे उपलब्ध होऊन दरातील तेजी टिकून राहायची. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये द्राक्षांची आवक मोठय़ा प्रमाणावर होईल. त्यामुळे दरात पडझड होण्याची शक्यता जास्त आहे. परिणामी द्राक्षविक्रीची पूर्वापार चालत आलेली व्यवस्था कोलमडून पडणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून खराब हवामानामुळे द्राक्ष पीक तोटय़ात आहे. हवामान खराब झाले, की औषधांच्या फवारणीचा खर्च वाढतो आणि पीकही हाताला लागत नाही. सततच्या तोटय़ामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कंगाल झाले आहेत. नव्याने खर्च करण्याची ताकद त्यांच्यात राहिली नाही. यंदा कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. म्हणूनच द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला आहे.

– शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

संत्री उत्पादनात साठ टक्के घट

नागपूर : कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात सरासरी ६० ते ७० टक्के घट झाली आहे. दुसरीकडे, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतानाही दरात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून येत नाही. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी अंबिया बहराच्या संत्र्याला २५ ते ३० हजार रुपये प्रतिटन दर होता. आताही हा दर कायम राहण्याची शक्यता आहे. या भागातून २५ टक्के संत्री बांगलादेशमध्ये निर्यात केली जाते. यंदा तेथील सरकारने आयात करात वाढ केली. परिणामी, निर्यात कमी आहे. त्याचप्रमाणे संत्र्याचा दर्जाही घसरला. उत्पादन कमी झाले तरी देशांतर्गत बाजारपेठेत सध्या भाव स्थिर आहे, असे श्रमजीवी नागपुरी संत्री उत्पादक कंपनी, वरुडचे संचालक रमेश जिचकार यांनी सांगितले. मात्र, नागपुरी संत्री जगप्रसिद्ध असल्याने दरवर्षी त्याला मागणी वाढतीच आहे. उत्पादन कमी झाल्याने यंदा बाजारात भाव अधिक मिळेल, असे संत्री उत्पादक व कृषी अभ्यासक अमिताभ पावडे यांनी सांगितले.

  विदर्भात सर्वसाधारणपणे सव्वालाख हेक्टरमध्ये संत्र्याची लागवड केली जाते आणि दरवर्षी सरासरी पाच ते सहा लाख टन उत्पादन होते. यंदा ते दोन ते तीन लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. जूनमध्ये प्रचंड तापमान आणि पाणी नसल्याने मृग बहार गळला, फळगळती झाली. अंबिया बहाराच्या संत्र्याला अतिपावसाचा फटका बसला. सध्या बाजारात अंबिया बहाराची संत्री येऊ लागली आहेत. उत्पादनात घट झाल्याने बाजारात दरवाढ अपेक्षित होती. सध्या २५ ते ३० हजारे प्रतिटन दर आहे. मागच्या वर्षीही दर याचदरम्यान होते, असे जिचकार यांनी स्पष्ट केले. बाजार स्थिर आहे. पण बांगलादेशमधील कर कमी झाले तर निर्यात वाढेल, त्याचा परिणामही बाजारपेठेवर होऊ शकतो, असे ते म्हणाले. विदर्भातील संत्री देशविदेशात जावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादकांवरचे संकट कायम आहे.

अतिपावसामुळे यंदा संत्री उत्पादन साठ ते सत्तर टक्के कमी होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने भारतातील संत्र्यावर अतिरिक्त कर आकारला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होईल. सध्या भाव स्थिर आहेत.

– रमेश जिचकार, संचालक, श्रमजीवी नागपुरी संत्री उत्पादक कंपनी, वरुड

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; संघटनेवर बंदीबाबतचा निर्णय केंद्राकडे : फडणवीस

संबंधित बातम्या

पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
नागपूर : रेल्वे प्रवाशांना सांताक्लॉज पावला; पुणे-मुंबईसाठी आता….
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
नागपूर: निवडणूक जिंकले आणि चक्क विद्यापीठाच्या इमारतीतच….
पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा; पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका