शाळेतून आल्यावर किंवा अगदी शाळेच्या डब्यात मुलांना कुरुssम कुरुssम खाऊ म्हणून, अनेकदा कुरकुरीत असे फ्रायम देत असतो. मात्र, बाहेरचे विकत आणलेले फ्रायम कोणत्या तेलात तळले असतील किंवा कशा पद्धतीने बनवले असतील, या विचाराने अनेक पालक चिंताग्रस्त असतात. त्यामुळे स्वतः किंवा लहान मुलांना घरीच पौष्टिक पदार्थ तयार करून कसे देता येतील, असा विचार वारंवार सर्वच पालकांच्या मनात घोळत असतो.

त्यामुळे लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीचे फ्रायम घरी कसे बनवायचे? याची सोपी रेसिपी सोशल मीडियावरील familyrecipesmarathi नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आली आहे. तसेच असे पदार्थ बनविण्यासाठी हवामानदेखील अगदी योग्य आहे. त्यामुळे लगेच फ्रायम कसे बनवावे याची रेसिपी लिहून घ्या.

हेही वाचा : Recipe : कोल्हापुरी रस्सा कसा बनवायचा? अरे गड्या सोपं आहे, ही रेसिपी पाहा….

साहित्य

एक वाटी तांदळाचे पीठ
पाच वाटी पाणी
मीठ
पापड खार

कृती

 • सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक वाटी तांदळाचे पीठ घालून घ्यावे.
 • त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून, तांदळाच्या पिठाचे मिश्रण ढवळून १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
 • आता एका कढईमध्ये तीन वाट्या पाणी घेऊन, तयार केलेले तांदळाचे मिश्रण घालून ढवळून घ्या.
 • आता ही कढई गॅसवर ठेवून, मिश्रण मोठ्या आचेवर १०-१२ मिनिटांसाठी शिजवून घ्या.
 • मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करावी.
 • आता या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि चिमूटभर पापडखार घालावा.
 • पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळून घ्यावे. तांदळाचे मिश्रण शिजल्यानंतर कढईखालील गॅस बंद करा.
 • आता एका पायपिंग बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तयार तांदळाचे मिश्रण भरून घ्यावे.
 • प्लास्टिक किंवा बटर पेपरवर गोल, चौकोनी, त्रिकोणी अशा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये मिश्रण पसरून घ्यावे.
 • आता हे सर्व फ्रायम्स कडकडीत उन्हात वाळत घाला.
 • फ्रायम वाळल्यानंतर तुम्हाला ते हवे तेव्हा तेलामध्ये तळून खाण्यास देता येतील.

हेही वाचा : Recipe : पौष्टिक खा तंदुरुस्त राहा; ‘मखाणा रायते’ बनवण्याची सोपी रेसिपी पाहा….

अशा या झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या कुरकुरीत फ्रायमची रेसिपी इन्स्टाग्रामवर @familyrecipesmarathi या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४.३ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.