ज्या कांद्याला अध्यात्मानं वज्र्य ठरवलं आहे, त्या कांद्यानंच एखाद्या अभंगाची सुरुवात व्हावी, एवढंच नव्हे तर त्या कांद्यातही विठाबाईच दिसावी, या गोष्टीची चारही मित्रांना थोडी गंमत वाटली..
कुशाभाऊ – अहो, पण उनातानात काम करणाऱ्या शेतकऱ्याला भाकरीसंग कांदा आणि मिरचीचा खर्डा हवाच.. ह्य़े बरोबर की तेवढय़ापुरता कांदा, मुळा या अभंगात नाई. पण ज्याला आपण वज्र्य ठरवतो, त्यातही देवच आहे, हेच लक्षात घ्यायला सांगितलंय..
बुवा – अगदी बरोबर!
हृदयेंद्र – पण बुवा, यापेक्षाही आणखी व्यापक असा अर्थ त्यात असलाच पाहिजे..
ज्ञानेंद्र – पण मी विचारतो, मुळात अध्यात्माला कशाचं वज्र्य असावंच का? अध्यात्माचं जाऊ दे, हृदू तू कांदा खात नाहीस ते का?
योगेंद्र – आणि त्यापेक्षा आश्चर्य म्हणजे हृदू तू आणि तुझे गुरुबंधू लसूण खाता! असं का?
हृदयेंद्र – (हसतो) कारणं मला माहीत नाहीत.. जसं सद्गुरुंनी सांगितलं तसं आम्ही पाळतो.. पण गंमत पहा, सगळा धार्मिक नियम कांदा आणि लसणीला सारखाच लागू असताना गुरुजींनी आम्हाला लसूण वज्र्य  केली नाही! आध्यात्मिक मान्यतांमधली ही क्रांती इतक्यात लक्षात येणार नाही! पण बरं ते जाऊ दे.. आपण अभंगाकडे वळू..
बुवा – अभंग परत एकदा वाचा..
हृदयेंद्र – (गाथेतलं पान उघडतो आणि गंभीरपणे वाचू लागतो) कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।। लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरी।। मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी।। सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायीं गोंविला गळा।।
योगेंद्र – या ‘कांदा’ शब्दांत काही वेगळा अर्थ आहे का?
हृदयेंद्र – वेगळा अर्थ नाही, पण एक वेगळी छटा आहे..
बुवा – कोणती हो?
हृदयेंद्र – कांदा हा फुकटच्या तर्कवितर्काचं एक रूपक आहे!
ज्ञानेंद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – कांदा कसा असतो? त्याचं साल काढत जा अखेपर्यंत सालच निघतात, आत काहीच नाही! इतर फळांचं कसं असतं? साल काढलं की आत फळ असतं, गर असतो.. मटार घ्या ते सोलले की आत दाणे असतात.. कांद्याचे छिलके कितीही काढले तरी हाती काही येत नाही..
कर्मेद्र – हाती कांदा येतोच की!
हृदयेंद्र – त्या अर्थानं नाही रे! रूपक म्हणून पाहा! तसं फुकटच्या तर्क वितर्काचं आहे. ते कितीही करीत बसा.. आयुष्य संपेल, हाती काही येणार नाही!
बुवा – वा! पण अभंगातल्या या पहिल्या शब्दाचा या अर्थाशी आणि अभंगाशी मेळ कसा बसतो?
हृदयेंद्र – म्हणजे, याच अर्थानं हा शब्द या अभंगाच्या सुरुवातीला सावता माळी महाराजांनी योजला आहे, असं मी म्हणत नाही..
कर्मेद्र – हे वेगळं कशाला सांगायला हवं? प्रत्येक अभंगाच्या चर्चेत तुम्हा तिघांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती किती वाहावत जाते, हे मी पाहातोच ना?
हृदयेंद्र – (ज्ञानेंद्र आणि योगेंद्रच्या हसण्यात सहभागी होत..) तर मुद्दा हा की कांद्याची योजना तशी असेलच असं नाही, तरी मला वाटतं की ज्या गोष्टींना आपण वज्र्य ठरवतो त्या गोष्टी काय किंवा आपले तर्कवितर्क काय, हे सारं भगवंतमयच आहे, असं सावता माळी महाराज सांगत आहेत..
योगेंद्र – दुसरी जाणवणारी गोष्ट अशी की पहिल्या चरणात कांदा, मुळा आणि भाजी म्हणजे कंद आणि भाज्यांचा उल्लेख आहे. दुसऱ्या चरणात लसूण, मिरची, कोथिंबीर या मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे. यात धान्याचा उल्लेख नाही! मुख्य अन्नाला जे पूरक आहे, त्याचाच हा उल्लेख आहे!
हृदयेंद्र – हो, हीसुद्धा छटा आहे खरी! म्हणजे जे पूरक आहे तेसुद्धा मुख्य भगवंतानंच भरून टाकायला सांगितलं आहे!
योगेंद्र – पण मग कांद्यापासून कोथिंबिरीपर्यंत भरलेल्या या दोन चरणांनंतर एकदम मोट नाडा विहीर दोरी अशा वस्तूंचा उल्लेख करण्यामागे काय रहस्य असावं?
कर्मेद्र – (प्रज्ञाकडे पाहात) मित्रहो, साक्षात एका आहारतज्ज्ञासमोर तुम्ही खाद्यचर्चा करीत आहात, हे विसरू नका!
चैतन्य प्रेम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhandhara sant savta mali abhang in marathi