‘मनाचे श्लोक’ वा गीतापठण स्पर्धा होतच होत्या, मात्र त्यांच्या सार्वत्रिकीकरणाचा ‘सूचना’वजा अट्टहास राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक पदरांना धक्का देणारा आहे..

विद्यामान शैक्षणिक विचारकुल हे या देशास विश्वगुरूपदी पोहोचण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि सध्या त्याच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र दुहेरी दुर्दैवी. भारतीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता हा आधीच चिंताविषय बनलेला असताना महाराष्ट्राचे शिक्षण खाते ही गुणवत्ता अधिकाधिक घसरावी यासाठी मोठ्या जोमाने प्रयत्न करताना दिसते. कसे; त्याचा तपशील गतसप्ताहात ‘लोकसत्ता’ने दोन वृत्तान्तांद्वारे दिला. ते वाचून शिक्षणासाठी येथे राहावयाची वेळ ज्यांच्यावर आलेली आहे त्यांच्याविषयी कणव आणि सहानुभूती दाटून येते. देशांतर्गत, देशवादी ज्ञानविज्ञानात जे जे उत्तम उदात्त उन्नत याचा परिचय पुढील पिढीस जरूर करून दिला जायला हवा. पण त्यासाठी आधुनिक ज्ञान-विज्ञानाकडे पाठ फिरवण्याची गरज नसते. वास्तविक प्रगतीचा मार्ग न सोडता प्रादेशिकता कशी राखावी यासाठी केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही दक्षिणी राज्यांचे अनुकरण करणे अगत्याचे आहे. तथापि ही दक्षिणी राज्ये हिंदी भाषकांच्या रथयात्रेत सहभागी होत नसल्याने शत्रुवत. त्यामुळे त्यांच्या चांगल्याचेही अनुकरण करण्याचा उदारमतवाद सत्ताधीशांकडून दाखवला जाणे अशक्य. अशा वेळी स्वत:च्या पोराबाळानातवांना ‘वाघिणीच्या दुधावर’ पोसून विकसित देशांत त्यांची पिढीप्रतिष्ठा झाल्यावर स्थानिक भाषा-संस्कृतीच्या नावाने गळा काढणाऱ्या येथील दांभिकांकडून देशीवादाचा सुरू असलेला उदोउदो ही केवळ लबाडी ठरते. तीस आता साथ आहे ती इंग्रजीवर प्रभुत्व नाही म्हणून स्थानिक भाषावादी बनलेले, आधुनिक विज्ञानात काडीचीही गती नाही म्हणून पुराणवादी झालेले आणि नव्याने परदेशी दिवे लावण्याची क्षमता नाही म्हणून देशीवादी झालेल्या अनेकांची. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा पुरता बट्ट्याबोळ झाल्यानंतरही जे उरले आहे त्याचीही माती करण्याच्या सरकारी प्रयत्नांचा समाचार घेणे कर्तव्य ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial maharashtra state board schools will have to read chapters in the study of manache shlok and geetapathan amy
First published on: 27-05-2024 at 05:00 IST