भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांचा आम्ही फक्त या भारतवर्षांतच नाही, फक्त आशियातच नाही, फक्त या पृथ्वीवरच नाही, फक्त या विश्वातच नाही तर शत सूर्य मालिकांच्या विश्वात निषेध करतो आहोत. हां, हां.. थांबा, गैरसमज नसावा, हा निषेध त्यांच्या त्या मागे घेतलेल्या विधानाबद्दल नक्कीच नाही. उलट तो आहे, त्यांनी न केलेल्या विधानाबद्दल. जग एक खेडे बनत असताना जगड्व्याळ होण्याची क्षमता असलेल्या या नव्या राजकीय ताऱ्याने, छे.. छे.. त्याच्या नावातच सूर्य आहे, त्यामुळे सूर्याने इतका संकुचित दृष्टिकोन ठेवावा हे काही आम्हास पटलेले नाही. या सूर्यासमोर आम्ही काजव्यासम असलो तरी न पटलेले बोलण्याचे धाष्टर्य़ करतो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरे तर तेजस्वी सूर्या हे महान मानवतावादी आहेत हे आम्हांस मनोमन पटले आहे. आता हेच बघा ना, तेजस्वी सूर्या यांच्या पक्षाचे नेते नुकत्याच ज्या धर्मसंसदेला उपस्थित राहिले होते, त्या धर्मसंसदेत हिंदूंचे रक्षण करण्यासाठी मुस्लिमांना ठार मारण्याविषयी बोलले गेले. पण महान मानवतावादी  तेजस्वी सूर्या असे काही करण्याऐवजी हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेऊ इच्छितात. लोकांना ठार मारण्यापेक्षा त्यांना आपल्यात सामावून घेणे हा वास्तविक खरा मानवतावादी विचार. तेजस्वी त्यासाठी फक्त भारतातच थांबत नाहीत, तर ‘बांगलादेश आणि पाकिस्तानातील सर्वाना’ हिंदू करून घ्यायचा चंग (विधान मागे घेईपर्यंत तरी) बांधतात.. ..आमचा आक्षेप आहे तो इथेच. शत सूर्य मालिकांचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या, नावातच तेजस्वी असलेल्या या माणसाने स्वत:ला आसपासच्या एकदोन देशांपुरते का म्हणून सीमित करून घ्यावे? त्याच्यासारख्या माणसासाठी अखंड हिंदुस्तानाचे स्वप्नदेखील संकुचितच. पाकिस्तान, पुढे अफगाणिस्तान, इराण, सगळे आखाती देश, रशिया, सगळा युरोप, अमेरिका, चीन असे करत सगळे जग हिंदू करण्याचे स्वप्न त्यांनी पाहावे. ते करून झाले की पुढे सर्व आकाशगंगांमध्येही भगवा ध्वज फडकवावा. महत्त्वाकांक्षेसाठी इतके विश्वाचे आंगण पडलेले असताना फक्त पाकिस्तान आणि बांगला देश या दोनच लहानखुऱ्या देशांबद्दल स्वप्ने पाहण्याची संकुचित बुद्धी दाखवल्याबद्दल आम्ही खरोखरच नाराज आहोत. कदाचित त्यांचा या दोन देशांच्या मार्गे जाऊन सगळे जग आणि मग इतर विश्वे पादाक्रांत करण्याचा मनसुबाही असावा, पण तो न समजल्याने कुणा संकुचितांनी लगेच पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू करून घेतलेल्यांना नेमक्या कुठल्या जातीत घेणार हा खल सुरू करून डोके उठवल्याने तेजस्वी सूर्या यांनी लागलीच आपली योजना बासनात गुंडाळून विधान मागेही घेऊन टाकले. तोवर किंचितसा उशीर झाल्याने पाकिस्तानने रीतसर निषेध वगैरे नोंदवण्याची संधी  घेऊन टाकली. पण सूर्या तोवर नामानिराळे झाले होते. यापुढे तरी आपली महत्त्वाकांक्षा अशी संकुचित न ठेवता त्यांनी खरोखर पुढे व्हावे.. इकडे करोनाने कितीही धुमाकूळ घालू दे, अर्थव्यवस्थेचे बारा वाजू दे, शिक्षणाची वाट लागू दे, बेकारी वाढू दे, माणसे भुकेपोटी वणवण फिरू दे..  शत सूर्य मालिकांनाही हिंदू करून घेतल्याशिवाय त्यांनी आता थांबूच नये.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma bharatiya janata yuva morcha national president mp tejasvi surya zws