‘पद्माभूषण’ किताब (१९९२ मध्ये) मिळाला म्हणून, नव्वदीत प्रवेश केला म्हणून, ९५ व्या वर्षीसुद्धा कार्यरत राहिल्या म्हणून… अशा अनेक निमित्तांनी डॉ. शारदा मेनन यांच्या मुलाखती विविध वृत्तपत्रे वा नियतकालिकांनी घेतल्या होत्या. ‘भारतातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ’ अशी ख्याती असलेल्या डॉ. शारदा यांचे निधन रविवारी चेन्नईत झाले; त्यानंतर या कधीकाळच्या मुलाखती पुन्हा आंतरजालावर प्रकटल्या. शारदा मेनन यांचा जीवनप्रवास सांगणारे पुस्तक असायलाच हवे होते, असे या मुलाखती वाचणाऱ्यांना वाटेल!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘वडील न्यायाधीश होते. मी आठवी मुलगी (जन्म : १९२३). आम्हां बहिणींना एकच भाऊ होता, पण माझ्या खेपेस वडिलांना दुसरा मुलगा हवा असताना मी झाले म्हणून नकोशी. शाळेत असतानापासून ‘माणसे अशी का वागतात?’ हा प्रश्न मला पडे. शिक्षणानिमित्त आधी बहिणीकडे, मग चेन्नईला वैद्यकीय शिक्षण आणि दिल्लीच्या जगजीवनराम (तेव्हाचे आयर्विन) रुग्णालयात उमेदवारी आणि तिथेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण, या काळात मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहिले. पण मानसोपचाराकडे वळण्याचा निर्णय घेतला तो मात्र, १९५५ मध्ये मनोरुग्ण विभागात एका १६ वर्षांच्या मुलीला पाहिले तेव्हा! अशा रुग्णांना आम्ही फक्त शामक-औषधे द्यायचो. तीन तासांत परिणाम उतरायचा. अशा स्थितीत आम्ही, पूर्ण बरी झालेली नसतानाच तिला घरी धाडले… बंगलोरच्या संस्थेने तेव्हाच मानसोपचाराचा अभ्यासक्रम सुरू केला होता. त्याच्या तिसऱ्या तुकडीत मी प्रवेश घेतला.’’ हा ऐवज डॉ. शारदा प्रत्येक मुलाखतीत विविध तपशिलांनिशी सांगत. त्या वेळी आप्तेष्टांनी ‘वेड्यांची डॉक्टर’ होण्यास विरोधच केला होता, पण निग्रहाने त्यांनी स्वत:चे वैद्यकीय ज्ञान मानसोपचाराच्या दिशेने वळवले. ‘रुग्णांना अवघड वा कसेसेच वाटू नये म्हणून’त्यांचा दवाखाना ‘मानसोपचारतज्ज्ञ’ या पाटीविना सुरू राहिला. अवसादावस्था (डिप्रेशन) आणि छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया/ शिझ्झोफ्रेनिया) हे मनोविकार आपल्याकडे अधिक असल्याची त्यांची खात्री होत गेली. सल्ला-समुपदेशन यासोबतच काही अ‍ॅलोपॅथिक औषधेही या आजारांवर घ्यावी लागतात. ही औषधे महत्त्वाचीच, पण ‘डॉक्टरने रुग्णाकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्यापासून उपचारांची सुरुवात होते’ असे त्या मानत! छिन्नमनस्कतेसाठी त्यांनी १९८४ साली, ‘स्कार्फ’ (स्किझोफ्रेनिया रिसर्र्च फाउंडेशन) या संस्थेची चेन्नईत स्थापना केली. ‘देशभरच्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मनोविकारासाठी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) ही सोय हवीच’ असा आग्रह त्यांनी केंद्र सरकारपुढे मांडला आणि तो मान्यही झाला. ९७ वर्षांचे समाधानी आयुष्य जगून त्या निवर्तल्या.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile sharda menon akp