इव्हान्जेलोस ओडेसिओस पापाथनासिऊ हे १७ मे रोजी, वयाच्या ७९व्या वर्षी वारले. या संगीतकाराचं नाव भारतीयांना माहीत असण्याचं काहीही कारण नव्हतं. ‘वांगेलिस’ हे त्याचं टोपणनावही बहुतेकांना माहीत नसेल. तरीही त्याचे सूर अनेक भारतीयांनी, अनेक मराठीजनांनी ऐकलेले आहेत. त्या गाण्याला मुद्दाम दाद नसेल कुणी दिली, पण ते गाणं ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना त्यांना ते लक्षात राहिलंच असेल.. कारण त्या गाण्याची चाल! ते रुंजी घालणारे चढे सूर.. होय चढेच. शक्तिशाली सूर. काहीसे आक्रमकसुद्धा भासणारे. ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ या १९८१ सालच्या चित्रपटासाठी वांगेलिस यांनी दिलेलं ते संगीत, त्या वर्षी ‘ऑस्कर’ची बाहुली पटकावणारं ठरलं. म्हणून लगेच भारतीय किंवा जगभरचे लोक वांगेलिस यांना ओळखू लागतील, असं का व्हावं?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाहीच झालं तसं. पण १९८८ मध्ये ‘खून भरी माँग’ नामक एक हिंदी चित्रपट आला. रेखा आणि कबीर बेदीचा चित्रपट म्हणून तो गाजला. रेखाची भूमिका तर ‘सिलसिला’नंतर सर्वात महत्त्वाची ठरली वगैरे. आणि त्या चित्रपटातलं, सहनायिका आणि कबीर बेदी यांच्या काहीशा आक्रमक प्रणयाची दृश्यं दाखवणारं पण नायिकेची मन:स्थिती व्यक्त करणारं गाणं गाजलं- ‘मैं तेरी हूं जानम तू मेरा जिया, जुदा तन से जान को किस ने किया’ – गायिका साधना सरगम, गीतकार इंदीवर आणि संगीतकार? नावापुरतेच राजेश रोशन. खरं या गाण्याचं संगीत वांगेलिस यांचंच!

वांगेलिस यांची खरी ओळख अभिजात- ‘क्लासिकल वेस्टर्न’ पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक वाद्यांवर संगीत निर्माण करणारे, अशी. वयाच्या चौथ्या वर्षीपासून पियानो शिकले, पण मिसरूड फुटण्याच्या वयात इलेक्ट्रिक गिटार हाती घेतली आणि ‘सिंथेसायझर’ आल्यावर तर त्यांना स्वत:चा सूरच गवसला. पाच-सहा सिंथेसायझर भोवताली ठेवून त्या सर्वातून एक सुरावट वाजवणारे वांगेलिस, हे चित्र चाहत्यांच्या मनावर कोरलं गेलं. १९६६ सालात त्यांनी ग्रीक चित्रपटाला संगीत दिलं. या ग्रीक फिल्मी संगीताची वाहवा आधी ब्रिटनमध्ये आणि मग अमेरिकेत इतकी झाली की, त्यांना तिथले चित्रपट, चित्रवाणी मालिका यांच्याकडून बोलावणी येऊ लागली. पण चित्रपटांचे संगीतकार होण्यात समाधान न मानता त्यांनी वन्यप्राण्यांवरल्या माहितीपट-मालिकेसाठी संगीत देताना, ‘ल अ‍ॅपोकॅलिप्स द अ‍ॅनिमॉ’ हा ऑपेराच रचला. १९९३ मध्ये तर ‘मायथोडिया’ ही संपूर्ण सिम्फनी (हार्प हे जुनं वाद्य आणि कंठय़संगीत यांच्या साथीनं) रचून त्यांनी सादर केली. या समूहाचंही नाव मायथोडिया. त्या सिम्फनीचे प्रयोग अटलांटिकच्या दोन्ही तीरांवर झालेच पण २००१ साली अमेरिकेच्या ‘नासा’नं, मंगळावरल्या स्वारीसाठी ‘अधिकृत संगीत’ म्हणून या मायथोडियाची निवड केली. २००२ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या फुटबॉल विश्वचषक मालिकेसाठी वांगेलिस यांनी रचलेलं अस्मितागीत (अँथेम) जपानी वळणाच्या तीव्र सुरांतलं होतं, त्यानं जपानमधल्या सीडी-विक्रीचे उच्चांक मोडले.

लयदारपणात कुठेही कसूर न सोडता स्वराचा ठाव चटकन बदलणं, वेग वाढवूनसुद्धा सुरांमधून अपेक्षित असणारं गांभीर्य कायम राखणं, ही त्यांच्या संगीतरचनांची वैशिष्टय़ं जणू, प्रचंड वेग असूनही संथ भासणाऱ्या अवकाशयानाला साजेशीच. त्यांच्या संगीतातला स्वरांचा अवकाशही विस्तीर्ण.. त्यामुळे समीक्षकांनी त्यांच्या संगीताला ‘अंतराळयुगाचं संगीत’ म्हटलं. हा अंतराळाचा संगीतकार आता अनंताच्या प्रवासाला गेला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh personality wangelis musician sur indians heard song ysh