extortion case against omie kalani after complaint file by son of former bjp corporator zws 70 | Loksatta

उल्हासनगरः ओमी कलानीवर खंडणीचा गुन्हा; भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची तक्रार, आरोप खोटा असल्याचा कलानींचा दावा

उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

उल्हासनगरः ओमी कलानीवर खंडणीचा गुन्हा; भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची तक्रार, आरोप खोटा असल्याचा कलानींचा दावा
ओमी कलानी photo source : Omie Kalani Facebook

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचा पुत्र आणि टीम ओमी कलानी गटाचा प्रमुख ओमी कलानी यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक आणि एकेकाळी कलानी कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या राजेश वधारिया यांच्या मुलाच्या तक्रारीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

हेही वाचा >>>ठाणे; मलेशियात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून चार जणांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

गेल्याच आठवड्यात उल्हासनगर शहरात रिपाइंचा कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्या निकटवर्तीयांनी पप्पू कलानी यांच्या निवासस्थान असलेल्या कलानी महल मध्ये शिरून दोघांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि पप्पू कलानी पुत्र ओमी कलानी यांचे निकटवर्तीय असलेल्या कमलेश निकम यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले होते. ही घटना ताजी असतानाच आता ओमी कलानी यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकेकाळी पप्पू कलानी आणि ते तुरूंगात गेल्यानंतर ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक असलेले मात्र गेल्या काही वर्षात कलानी यांची साथ सो़डून भाजपात स्थिरावलेल्या राजेश वधारिया यांच्या मुलाच्या तक्रारीवरून हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरेन वधारिया यांची उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात कृष्णा निवास  ही इमारत आहे. ही इमारत बोगस फेरफार करून बांधण्यात आली आहे, असे नमूद असलेली एक नोटीस 1 डिसेंबर रोजी एक अज्ञात इसमाने धिरेन वधारिया यांना एक नोटीस दिली. त्यात बेकायदा कृष्णा निवास इमारतीवर कारवाई होण्यापासून वाचवयची असेल तर ओमी कालानीला 50 लाख द्यावे लागतील. अन्यथा इमारत पाडण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. त्या व्यक्तीकडे विचारपूस केली असता तो ओमी कलानी यांच्या कार्यालयातून आल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार धिरेन वधारिया यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एक अज्ञात इसम आणि ओमी कलानी यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर शहरातील राजकारण तापू लागले आहे.

याबाबत ओमी कलानी यांना विचारले असता, नगररचना विभागाच्या नियमांना बगल देत ही इमारत उभारली आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी ज्योती कलानी आमदार असतानाच त्यांनी ही तक्रार केली होती. पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 15:43 IST
Next Story
ठाणे: लाच घेतल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकारी ताब्यात; गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होते पैसे