डोंबिवली – भागशाळा मैदान येथून हल्ल्यातील मृतांचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमी येथे जात होती. डोंबिवलीतील हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. हा प्रकार सुरू असतानाच काही संतप्त नागरिकांनी अंत्ययात्रेच्या सुरूवातीला येऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानच्या नावाने फलक जाळले.या प्रकारामुळे अंत्ययात्रेत अडथळा येण्याची शक्यता विचारात घेऊन अंत्ययात्रेतील बंदोबस्तावरील पोलीस, माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या संतप्त नागरिकांना शांत केले. पोलिसांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांनी पेटवलेले फलक विझविण्यास लावले. त्यानंतर अंत्ययात्रा पुढे मार्गस्थ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंत्ययात्रेत शोकाकुल वातावरण असले तरी दहशतवादी कृत्य पाकिस्ताननेच केले असा आरोप करत पाकिस्तानच्या विरोधात नागरिक घोषणा देत होते. वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता विचारात घेऊन तगडा पोलीस बंदोबस्त अंत्ययात्रेच्यावेळी ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे अंत्ययात्रेच्या चारही बाजुने बंदोबस्तावर होते. साध्या वेशातील, शोध पथकाचे पोलीस यावेळी उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Placards burning with slogans against pakistan during funeral procession in dombivli amy