Bengaluru : सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर अनेकजण त्यांना आलेला एखादा अनुभव शेअर करत सोशल मीडियावर मांडतानाही पाहायला मिळतात. अनेकदा एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्येही भांडणं झाल्याचेही व्हिडीओ व्हायरल होतात. आता असाच प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. बेंगळुरूमध्ये बीएमटीसी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला वाहकाने (कंडक्टर) मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

इतकंच नाही तर वाहकाने प्रवाशाला हिंदीत नाही तर कन्नडमध्ये बोला असं सांगितल्याचंही व्हायरल व्हिडीओतून समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ एका व्यक्तीने एक्स अकाउंटवर (ट्विटर) शेअर केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

हेही वाचा : रेल्वेमध्ये प्रवासी अन् टीसीमध्ये रंगला वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाचा आदेश…” नेमकं काय घडलं पाहा

नेमकं काय घडलं?

अभिनव राज या व्यक्तीने एक्स अकाउंटवर (ट्विटर) शेअर केलेल्या पोस्टनुसार, काल रात्री बेंगळुरूमधील एका हॉस्पिटलजवळ बीएमटीसी बसमध्ये वाहकाने माझ्यावर हल्ला केल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. तसेच युपीआयद्वारे (UPI) पेमेंट घेण्यास नकार दिल्यानंतर बीएमटीसीच्या वाहकाने मला शाब्दिक शिवीगाळ करत मारहाण केली, असा आरोपही या प्रवाशाने केला आहे.

दरम्यान, या एक्स अकाउंटवर (ट्विटर) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बसच्या वाहकाने त्या प्रवाशाला मारहाण करत हिंदीमध्ये नाही तर कन्नडमध्ये बोला, असं म्हणत बसचा वाहक प्रवाशाविरोधात आक्रमक झाल्याचंही व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. तसेच प्रवाशी आणि वाहक यांच्यामध्ये तिकीटावरून वाद झाला आणि त्यानंतर हा वाद वाढला आणि प्रवाशाला बसच्या वाहकाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेबाबत आपण बीएमटीसीकडे तक्रार करणार असल्याचंही प्रवाशाने व्हिडीओत म्हटलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.