तृतीयपंथीयांना कमी लेखावं, त्यांचा तिरस्कार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही आपल्या समाजात आणि परदेशांमध्येही तृतीयपंथीयांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळ केली जाते. सगळीकडे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने बघितलं जातं. त्यांना समाजामध्ये चांगल्या राहणीमानाची नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही. पण काही महिन्यांपूर्वी हे सारे पूर्वग्रह मोडत के. प्रीतिका यशिनी या देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या. त्यांच्यानंतर आणखी एका तृतीयपंथीयाने मनुष्यबळ विकास अधिकारी बनत समाजापुढे नवं उदाहरण ठेवलं आहे. त्यांचं नाव आहे झारा शिखा. त्या केरळ राज्यातल्या पहिल्या वहिल्या मनुष्यबळ विकास अधिकारी ठरल्या आहेत. केरळातल्या एका बड्या मल्टिनॅशनल कंपनीत त्या या पदावर कार्यरत आहे. शशी थरूर यांनी पहिल्यांदा झारा यांची काहाणी जगासमोर आणली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मध्यमवर्गीय कुटुंबात झारा उर्फ नितीनचा जन्म झाला. नितीन ते झारा होण्याचा प्रवास तसा सोपा नव्हताच. यात अनेक चढ उतार आलेत आणि हेच चढउतार झाराने आपल्या गोष्टीतून मांडले आहेत. तिने फेसबुकवर लिहिलेली पोस्ट अगदी जशीच्या तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.

” तू पुरूषांसारखा का नाही वागत? हेच टोमणे मी लहानपणापासून ऐकत आलोय. पण मला पुरूषांसारखं राहायला नाही आवडत. मला रंग आवडतात. मला मुलींसारखं रंगीबेरंगी कपडे घालायला आवडतात. मला त्यांच्यासारखं राहायला आवडतं. पण शाळेत असताना सगळेच मला चिडवायचे, काही मुलं मला अर्वाच्य भाषेत हाक मारायचे. त्या काळात माझी कधीच मुलांशी गट्टी जमली नाही. मी मुलींसोबत खेळायचो. माझे वडील मला खूप ओरडायचे. त्यांना माझी लाज वाटू लागली. मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो तेव्हा तर तिथली मुलंही मला आणखी चिडवू लागले. मला याचा खूप मनस्ताप व्हायचा. मी हळूहळू बदलत जाऊ लागलो, माझं नाव नितीन होतं. पुरूष म्हणून मी जन्माला आलो असलो तरी मला बाईसारखं राहायला आवडू लागलं.

मी लपून छपून माझ्या आईची साडी नेसू लागलो. मेकअप करू लागलो. हे करताना मला वेगळंच सुख मिळायचं. एकेदिवशी घरी वडिलांना हा प्रकार समजला. त्यांनी माझा मेकअप बॉक्स तोडला. माझे कपडे जाळले. त्या दिवशी मी मनाशी पक्क केलं. मला पुरुषांसारखं जगायचं नाही मला स्त्रियांसारखं जगायचं आहे. मी घर सोडलं. शाळेत असताना मी हुशार होतोच. पुढे मी माझ्या अभ्यावर लक्ष केंद्रित केलं. शिकत असताना मला तृतीयपंथीयाबद्दल कळत गेलं. मी माझी पूर्वीची ओळख पुसली आणि नितीनचा मी झारा झालो. मी तृतीयपंथी आहे हे सांगायला आता मला कसलीच लाज वाटत नाही. मी शिकलो. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अनेकांनी नकार दिलेत. पण मी हार मानली नाही. शेवटी मी यशस्वी झालोच. आज मी एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत मनुष्यबळ विकास अधिकारी आहे. ”
शशी थरूर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण झारा शिखा यांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet zara sheikha first transgender hr executive from kerala