X

योग, आयोग आणि योगायोग..

केवळ विकासकामे करणे हे काही सरकारचे एकमेव काम नसते.

केवळ विकासकामे करणे हे काही सरकारचे एकमेव काम नसते. लोकांच्या जीवनात बदल घडवून आणून त्यांना आनंद देणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आणि सामाजिक दायित्वदेखील असते. अशा एका आगळ्या कर्तव्यपूर्तीचा आनंद हरयाणा सरकार साजरा करत असताना बाबा रामदेव हे त्याचे साक्षात साक्षीदार ठरले हा काही केवळ योगायोग नाही. येत्या एप्रिलपासून हरयाणाच्या कुंडलीमध्ये एक नवा योग बलस्थानी प्रस्थापित होणार आहे. त्याची पूर्वतयारी झाली आहे आणि वेळापत्रकही हरयाणाच्या खट्टर सरकारने नक्की केले आहे. योग हे तणावमुक्तीचे साधन असते, योग हा आरोग्यदायी जगण्याचा मंत्र आहे, यात आता शंका राहिलेली नाही. म्हणूनच, योगाद्वारे आनंदी व समृद्ध हरयाणा घडविण्यासाठी खट्टर सरकार आता योग आयोगाची स्थापना करणार आहे. याआधी छत्तीसगड सरकारने असा योग आयोग स्थापन केलेला असल्याने हरयाणातील योग आयोग हा काही पहिलाच योगायोग नव्हे. आता हरयाणात योग आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. आता सरकारी प्रथेप्रमाणे योग आयोगासाठी अध्यक्ष, सदस्यांची नियुक्ती करावी लागेल, योगविद्याभूषित मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागेल, जागोजागी कार्यालयांची सुविधा निर्माण करावी लागेल, आणि मुख्य म्हणजे, राज्यभरातील जनतेला आनंद व व्यक्तिमत्त्व विकासाची अनुभूती देण्यासाठी योगसाहित्याची मोठी खरेदी करावी लागेल. त्याकरिता सरकारी तिजोरीतून दरसाल निधीची भरघोस तरतूद करणे हा या आयोगासाठी पहिला व पुढे दरसाल येणारा अनोखा आनंदयोग असेल.. ग्रामपंचायती आणि शाळाशाळांमध्ये योगशिक्षणाचे वर्ग सुरू करण्याकरिता योगशिक्षक नेमावे लागतील, त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल, पाठय़क्रम तयार करावा लागेल आणि पुस्तकेदेखील छापावी लागतील. त्यासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठालाच साकडे घालावे लागले हा मात्र निव्वळ योगायोगच! ..अशा तऱ्हेने, संपूर्ण राज्य योगमय करण्यासाठी आयोगास झटावे लागेल. मुळातच, आयोग या व्यवस्थेचे योगाशी फारसे चांगले नाते नसते असे म्हणतात. योग ही प्राचीन विद्या. तो केवळ अभ्यास नव्हे, तर साधना असते असे म्हणतात. आयोग या शब्दातही योग असणे हा केवळ योगायोगच म्हणावा लागेल. तरीही, इथे योगास लागलेल्या ‘आ’ या ‘उपसर्गा’ने त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे केले तर काय होणार, या विचाराने या देशातील प्राच्यविद्या संशोधकांना कदाचित ‘योगासाठी आयोग’ ही कल्पना फारशी रुचेल असे नाही. कारण उपसर्ग ही संकल्पना नेहमीच सुचिन्हे दर्शविणारी नसते. उपसर्ग या शब्दाचा अर्थच, योगसाधनेतील अडथळा असा असतो. आयोग या शब्दातील योगाच्या उपसर्गाने तसे काही करू नये, यासाठी खट्टर सरकारला बहुधा आयोगाची विधिवत शांती करावी लागेल. सरकारी प्रथेप्रमाणे कोणत्याही अतृप्ततेला शांत करण्याच्या विधीचे अनेक मार्ग असले तरी सगळ्यांचा अर्थ एकच असतो, आणि ‘अर्थ हेच आनंदाचे मूळ’ असते. त्यामुळे, जनतेच्या आयुष्यात आनंद रुजविण्यासाठी व व्यक्तिमत्त्वाला नवा उजाळा देण्यासाठी हरयाणातील जनतेच्या कुंडलीमध्ये प्रस्थापित होणाऱ्या योगास आयोगाच्या उपसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी खट्टर सरकार उपाययोजना करेल, यात शंका नाही.

शिवाय, सरकारच्या या निर्णयाने पतंजली योगपीठाच्या कुंडलीतील बलस्थाने अधिक भक्कम होणार असल्याने, आयोगाचा उपसर्ग त्या कुंडलीपर्यंत पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. एवढे साधले, म्हणजे, पतंजलीने कष्टपूर्वक तयार केलेला योग पाठय़क्रम राबवून हरयाणातील भावी पिढय़ांमध्ये नवे ‘योगी’ निर्माण होतील आणि समाजजीवनातील सारी पापे पळून जातील.. खट्टर सरकारच्या स्वप्नातील तो भविष्यदिन जेव्हा कधी प्रत्यक्षात अवतरेल, तेव्हा तो हरयाणाचा एक ‘आनंदयोग’ असेल यात शंका नाही!

22
READ IN APP
X