वसई: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करण्याची आणखी एक घटना वसईमध्ये उघडकीस आली आहे. बँकेतून निवृत्त झालेल्या एका वृध्द महिलेला सायबर भामट्यांनी तब्बल २८ लाखांचा गंडा घातला आहे. एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. फिर्यादी महिला ७६ वर्षांच्या असून त्या मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरात रहातात. त्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचे पती आजारी असल्याने त्या वसईतील एका नामांकित आश्रमात सध्या पतीच्या उपचारासाठी रहातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ जुलै रोजी त्यांना एका सायबर भामट्याचा फोन आला. मी रिझर्व बँक ऑफ इंडिया मधून बोलत असून तुमच्या नावाने घेतलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असल्याचे त्याने सांगितले. तसेच तुमच्यावर हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या नंतर फिर्यादी यांना हैद्राबाद पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल आला आणि फिर्यादी यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे सांगितले. तुमच्या सर्व बँक खात्यांवर नजर असून असल्याचे सांगून दिवसभर त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर ‘अटक’ करून ठेवली. यातून मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या. त्या चार वेळा वांद्रे येथील आपल्या बँकेत गेल्या आणि २८ लाख रुपये या सायबर भामट्यांना पाठवले.

हेही वाचा : वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होण्याची भीती, पती-पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

हा सगळा प्रकार अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत घडला. यानंतर भामट्यांनी फिर्यादी महिलेचे शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. त्यानंतर मात्र फिर्यादी यांना संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ‘डिजिटल अरेस्ट’ नावाचा कुठलाही प्रकार नसतो. मात्र लोक त्याला बळी पडत आहेत. फिर्यादी महिला बँकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या. तरी देखील त्या भामट्याच्या जाळ्यात फसल्या असे वसई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले

एकाच आठवड्यातील दुसरी घटना

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वसई पोलीस ठाण्यात एकाच आठवड्यात नोंदविण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे. दोन दिवसांपूर्वी एका आयटी तज्ञाला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला होता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai retired female bank officer cheated for rupees 28 lakhs in the name of digital arrest css