वसई : एक अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे प्रकरण नालासोपारा येथे उघडकीस आले आहे. बलात्कारानंतर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकणाला वाचा फुटली आहे. आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवून निर्जन स्थळी नेले होते आणि तिच्यावर बलात्कार केला होता. नालासोपारा पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी सध्या १७ वर्षांची असून महाविद्यालयात शिकते. तिने नालासोपारा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्यावर बलात्काराची पहिली घटना मागील वर्षी घडली होती. आरोपी सुनिल कुमार निर्मल (३३) गेल्या काही दिवसांपासून तिला त्रास देत होता. फोन करून, रस्त्यात अडवून शरीरसुखाची मागणी करत होता. ऑगस्ट २०२४ मध्ये ती महाविद्यालयतून येत असताना तिचा आरोपी सुनिल कुमार निर्मल याने पाठलाग केला. काही अंतरावर जाऊन त्याने तिला अडवले. पीडित मुलीला चाकूचा धाक दाखवला. तिच्या मतीमंद भावाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर तिला बळजबरीने रिक्षात बसवून नालासोपारा पश्चिमेच्या निळेगाव येथील दर्गाजवळ नेले आणि तेथील झाडांच्या पाठीमागे आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यांतर तो ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात वारंवार तिला धमकावून बलात्कार करत होता. त्यामुळे ती ३ महिन्यांची गरोदर राहिली. अखेर याप्रकऱणी तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. नालासोपारा पोलिसांनी आरोपी सुनिल कुमार निर्मल याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ७८, ८७, ६४(२) सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण २०२१२ च्या कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अन्य दोन घटनांमध्ये मुलीवर बलात्कार, विनयभंग

एकाच दिवशी अन्य दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी एकाच दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारील व्यक्तीने बलात्कार केला आहे. ही मुलगी घरात एकटी होती. तिचे आई वडिल गावी गेले होते. त्यावेळी तिच्या शेजारी राहणारा ५४ वर्षीय हुबनारायण रामकुबेर यादव याने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. तिच्या आई वडिल घरी आल्यावर तिने हा प्रकार सांगितला. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात यादव याच्याविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका १५ वर्षाच्या मुलीचा भरत शाह (५०) नावाच्या आरोपीने विनयभंग केला आहे. ती मुलगी रात्री खरेदी करण्यासाठी जात असता आरोपीने तिला रस्त्यात गाठले. आरोपी तिच्या परिचयाला होता. तिला तो फूस लावून निर्जन स्थळी नेऊन तिचा विनयभंग केला. वसई पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ७५, ७५ (१) ७५(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl raped at knifepoint in vasai css