रावसाहेब पुजारी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज देऊनही जून संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील ८० टक्क्यांहून अधिकतर शेती ही पावसावर अवलंबून आहे. यापैकी भात, सोयाबीन आणि कापूस हे पिके पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे यंदाच्या लांबलेल्या पावसाचा या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. पुन्हा अचानक मोठा पाऊस सुरू झाल्यास पुन्हा पेरण्या लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

पूर्वमोसमी पावसाने रानं थंड झाली. पेरणीपूर्व मशागतीने वेग घेतला. हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदाचा खरीप हंगाम खूपच चांगला चालेल, असे सर्वसाधारण लोकमानस तयार होत असताना राज्याच्या अनेक भागात पावसाने हुलकावणी दिलेली आहे. याचा परिणाम एकूणच खरीप हंगामावर होणार आहे. राज्यात यंदा मागणीएवढी बियाण्याची उपलब्धता नसताना पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंता खूप वाढलेल्या आहेत. ज्यांनी सुरुवातीच्या काळात पेरणी केली, त्यामध्ये भात, सोयाबीन, कडधान्ये पिकांची चांगली उगवण झाली असली तरी हक्काच्या सुरुवातीच्या काळातच पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत. शेतकरी असे धाडस करू शकत नाही. तसेच कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठातून दमदार पाऊस सुरू झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

एका बाजूला पावसाने दडी मारली असतानाच राज्याच्या वेगवेगळय़ा भागात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच कृषी निविष्ठांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने छोटय़ा शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील अर्थगणित पार कोलमडलेले आहे. बियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते, कीटकनाशके, रोपांच्या तसेच शेतमजुरीच्या दरात फार मोठी वाढ झालेली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या औजारांच्या भाडय़ाच्या दरातही फार मोठी वाढ केल्याने शेती परवडेनाशी झालेली आहे. त्या तुलनेत शेतीमालाला दरवाढ नाही. उलट अनेकदा आलेले उत्पादनही शेतकऱ्यांच्या अंगावर पडते आहे. त्यामुळे शेतीविषयचे निराशाजनक चित्र तयार झालेले आहे. यासाठी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापराकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शेतीतील अपशिष्ट पदार्थाचा शेतीतील फेरवापरावर अधिक भर दिल्यास तसेच शेतीमालाच्या अवशेषांच्या वापरातून शेतीत कमी खर्चाचे तंत्र वापरण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे.

सुरुवातीला पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्याने अनेक भागात धूळवाफ्यातील पेरण्या झालेल्या आहेत. तसेच अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे यंदा वेळेवर झालेली दिसतात. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस न झाल्याने आता शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. पाऊस कधी सुरू होईल, याचा खात्रीशीर अंदाज नाही. त्यामुळे ऐन पावसाळय़ामध्ये कडक उन्हाळय़ाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी घाई करणार नाही. करत नाही. पण हक्काच्या पेरणीचे दिवस निघून गेल्याने उशिरा पेरणी झाल्यास सोयाबीन, कडधान्य काढणीच्या वेळी पावसाने नुकसानीची धास्ती वाढलेली आहे. यामुळे सोयाबीनचे क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होईल. भरडधान्य आणि कडधान्याच्या क्षेत्रात काही अंशी वाढ होईल. तसेच तेलबियांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

राज्यात भात, सोयाबीन, कापूस आणि ऊस ही प्रमुख पिके आहेत. भाताचे क्षेत्र कोकण आणि विदर्भात मोठय़ा प्रमाणात आहे. सोयाबीन पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. तर कापूस मराठवाडा आणि विदर्भात मोठय़ा प्रमाणात घेतला जातो. ऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात जास्त प्रमाणात होतो. आजही महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र २१ टक्केपेक्षा जास्त नाही. म्हणजे ८० टक्क्याहून अधिकेतर शेती ही पावसावर अवलंबून आहे. यापैकी भात, सोयाबीन आणि कापूस ही पिके पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे यंदाच्या लांबलेल्या पावसाचा या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. पुन्हा अचानक मोठा पाऊस सुरू झाल्यास पुन्हा पेरण्या लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पावसाळा कसा राहतो, यावर त्याचे उत्पादन अवलंबून आहे. यंदाच्या आजवर व्यक्त झालेल्या अंदाजापेक्षा पावसाची सुरुवात तरी नीट झालेली नाही. यापुढे तो कसा राहील, याचा अंदाज व्यक्त करणे शेतकऱ्यंच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावर शेतकऱ्यांना आपल्या पीक नियोजनात बदलही करावे लागणार आहेत. कापसात बी.टी. वाण, तर भात आणि सोयाबीनमध्ये विविध संकरित वाण आलेले आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

लांबलेला पाऊस, लांबलेली पेरणी आणि अचानक झडीचा पाऊस सुरू झाल्यास होणारा खोळंबा आणि जमिनीवर पडणारे दडपण यामुळे पिकाच्या उगवणीवरही परिणाम होईल. या ठिकाणी दुबार पेरणीचा मोठा धोका संभवतो. यासाठी शेतकऱ्यांनी अधिक काळजीपूर्वक पेरणी करण्याची गरज आहे. पेरणी आणखी पुढे गेल्यास कमी कालावधीत येणाऱ्या काही वाणांचा विचार करावा लागणार आहे.

भात आणि सोयाबीनमध्ये संकरित वाण आल्याने प्रतिवर्षी नवीन वाण घेऊन त्याची पेरणी केली जाते. भारतात भाताखालील क्षेत्र १८८ लक्ष हेक्टर इतके आहे. भात हे धानपीक असल्याने चरितार्थासाठी लागणाऱ्या उत्पादनाला शेतकऱ्यांची पहिली पसंती असते. अधिकचा भात विक्रीसाठी जातो. भातातही अनेक वाण आहेत. यातील अनेक देशी वाण परंपरेने शेतकरीच जपतात. निवड पद्धतीने त्याचे संवर्धन शेतकरीच करीत असतो. चव, सुगंध आणि आकारानुसार अनेक चांगले वाण भातात आहेत. आता महाबीज आणि इतर खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यांनी अनेक संकरित वाण विकसित केलेले आहेत. भात हा कोकण आणि विदर्भात जास्त प्रमाणात होतो. तेथे आदिवासी आणि कोकणी लोकं घरच्या घरी भाताच्या बियाण्याचं संवर्धन करताना दिसतात. त्यामुळे भात बियाण्यांचा बाजार कापूस आणि सोयाबीनच्या तुलनेत कमी आहे. भातासाठी फार मोठी यातायात करावी लागत नाही. पुन्हा भाताचे बाजारमुल्य सोयाबीन आणि कापसाच्या तुलनेत कमी आहे.

सोयाबीन हे व्यापारी नगदी पीक आहे. कमी कालावधीत ते येते. खरीप आणि उन्हाळी हंगामात सोयाबीन घेतले जाते. उसात आंतरपीक म्हणून तसेच फेरपालटाचे पीक म्हणूनही शेतकरी सोयबीन घेतात. महाराष्ट्रात ४६ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. राज्याच्या काही भागात पाऊस झाल्याने तेथे पेरण्या झालेल्या आहेत. साधारणपणे ९० ते ११० दिवसात सोयाबीन काढणीस येते. त्यामुळे सोयाबीन घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सोयाबीनमध्ये फुले संगम (३७८), फुले किमया(७५३), फुले अग्रणी (३४४), समृद्धी (७१), एमएयुएस -११८८, एमएयुएस -१५८, जेएस झ्र् ९३०५, सुवर्णसोया, शक्ती -८१, येलो-गोल्ड झ्र् १००१ अशा अनेक जाती विकसित आहेत. याशिवाय अनेक नावांनी संकरित वाण बाजारात येतात. यामध्ये फार मोठा अर्थबाजार सामावलेला आहे. त्यामुळे अनेक व्यापारी, खासगी कंपन्या आणि महाबीजसारखी शासकीय संस्था यामध्ये मोठा सहभाग नोंदवतात. यातील महाबीजचा वाटा ४० टक्क्यापेक्षा जास्त आहे. तर खासगी कंपन्यांचा वाटाही ४० टक्क्यांच्या बरोबरीचा आहे. उरलेला २० टक्के वाटा घरातील बियाणे वापरात सामावलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांची मानसकिता, परंपरागत चालत आलेली पद्धती, बियाणे बॅंकांचे प्रयत्न, कृषी विभागाच्या सामूहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांचे केलेले प्रबोधन आणि अनुपलब्धतेतून घरचे बियाणे घेतले जाते. एकूणच बियाणे उद्योगामध्ये कोटय़ावधीचा व्यापार होतो. हा व्यापार सगळय़ाच पावसाच्या अंदाजावर चालतो. पुन्हा अंदाजाप्रमाणे पाऊस झाला नाहीतर त्याचा विपरीत परिणाम या बाजारावरही होतो. लोकांची मानसिकता, बाजारभाव आणि या आधीच्या वर्षांत झालेले पेरक्षेत्र याचा विचार यासाठी केला जातो.

महाबीज ही सरकारी कंपनी असल्याने शेतकऱ्यांचा तिच्यावर जास्त विश्वास असतो. शेती विभागही प्राधान्याने तिच्याच बियाण्याचा आग्रह धरते. नॅशनल सीड कॉर्पोरेशनही शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धतेसाठी प्रयत्न करते. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून शेतकरी यामध्ये या संकरिता बियाण्यांवर अधिक अवलंबून राहतो. महाबीज असू दे, नाहीतर खासगी कंपन्या असूद्यात; पेरणीसाठी बियाणे उपलब्धतेची एक पद्धत विकसित केलेली आहे. चांगल्या प्रतिच्या किंवा ‘एफ-१’ बियाणे प्लॅटसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते. सर्टिफाईड पायाभूत आणि मूलभूत बियाणे अशा बियाणे प्लॉटसाठी शेतकऱ्यांना दिले जातात. त्यावर सगळय़ा प्रक्रिया करून बियाणे प्लॉट घेतले जातात. त्याच्या सगळय़ा नोंदी ठेवल्या जातात. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शेतकरी याबाबतची दक्षता घेत असतात. त्यातून तयार झालेले आणि सगळय़ा चाचण्यांतून पुढे आलेले बियाणे कंपन्या नियमित बाजारापेक्षा जादाच्या बांधल्या भावाने या शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची साधारण उगवण क्षमता तपासली जाते. त्यावर कंपनीचा शिक्का मारून सीलबंद पिशवीतून ते मार्केटला आणले जाते. यासाठी राज्याच्या गुण नियंत्रण विभागाचे नियंत्रण असते. यातूनही अनेकदा बोगस बियाणे बाजारात येते आणि ते विकले जाते. यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी येतात. 

बियाणे प्लॉट, बियाणे निर्मिती, सीलबंद सर्टिफाईड बियाणे आणि बियाणे विक्री या सगळय़ावर कृषि विभागाच्या गुण नियंत्रण विभागाच्या मान्यतेची मोहर लागावी लागते. राज्याची गरज, पूर्वानुमान आणि उपलब्धता तसेच शेतकऱ्यांची मागणी या सगळय़ांचा मेळ घालून याबाबतच्या परवानग्या दिल्या जातात. यासाठी विशेष गुणके ठरविली आहेत. याबर हुकूम दक्षता घेऊन शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा होतो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागात तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर दक्षता पथक नेमलेली असतात. यासाठी शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन उपलब्ध केलेली असते. तरीही बोगस बियाण्याचे गोरख धंदे राजरोसपणे चाललेले असतात. अधून-मधून त्याच्यावर धाडी टाकल्याच्या बातम्या येतात. वानगीदाखल एकाद-दुसरी केस गुदरली जाते. धाडीतील बियाणे जप्त केले जाते. ते किंवा त्या लॉटमधील बियाणे विक्री करण्यापासून रोखले जाते. क्वचित प्रसंगी बोगस बियाण्याची कंपनीकडून भरपाई दिली जाते. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यातून होते. अनेकदा यातील चुका या शेतकऱ्यांच्या माथ्यावर फोडतात, असा अनुभव आहे.

अनेकदा एकदम दमदार पाऊस होतो. शेतकऱ्यांना बियाण्याची, कृषी निविष्ठांची निकड सुरू होते. अनेकदा एकादा प्रचलित, अधिक वाणाची चर्चा होते. त्याचाच आग्रह शेतकरी धरू लागतात. याचा मार्केटमध्ये व्यापारी गैरफायदा घेतात. तक्राही होऊन त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया होईपर्यंत त्याचा बाजार उठलेला असतो. यातून शेतकऱ्यांची मोठी लूट होते. राज्याच्या कोणत्या ना कोणत्याही तरी भागात असे प्रकार सर्रास घडतात.

महाबीज असो, की खासगी कंपन्या, अनेकदा बोगस बियाण्यांची जबाबदारी घेत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या चुकांकडे लक्ष वेधले जाते. यासाठी कृषि विभागाने अधिक दक्षतेने तक्रारी येताच नीट पंचनामे, कंपनींची कागदपत्रे, स्टॉक पाईंटचे पंचनामे, अनियमितता यांचा अभ्यास करून कागदपत्रे न्यायालयामध्ये सादर केली तरच संबंधितावर कारवाईची शक्यता असते. अन्यथा यातून कंपनीचे लोक पळवाटा शोधून मोकळे होतात. न्यायालयाच्या बाहेर तडजोडी होतात. यामध्ये अंतिमत: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी पाऊस लांबला, पेरण्यांना सुरुवात नाही. पेरक्षेत्रावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी आता अधिक दक्षतेने काम करण्याची गरज आहे.

बियाणे खरेदी करताना ही दक्षता घ्या

बदललेल्या परिस्थितीत आपतकालीन परिस्थिती येण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना, त्याची पेरणी करताना अधिक जागरूक राहिले पाहिजे. शक्यतो सीलबंद पिशवीतीलच बियाणे खरेदी करावे. बियाणे उत्पादक कंपनी, तिची बाजारातील विश्वासार्हता, पिशवीला लावलेल्या टॅगची सगळी माहिती घेतली पाहिजे. ज्या दुकानातून बियाणे खरेदी केले जाते, त्यांच्याकडून छापील किमतीप्रमाणे खरेदी पक्की पावती घ्यावी. ती पावती आणि बियाण्याची पिशवी, तिच्यावरील टॅग जपून ठेवावा. पिकाची उगवण, उत्पादन, पीक येईपर्यंत ते जपून ठेवावे. बोगस बियाणे आढळल्यास त्याच्या आधारे तक्रार नोंदविता येते. त्यातून भरपाई मिळविता येते. पेरणी करण्यापूर्वी घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासता येते. तसेच रोग-किडींपासून बचावासाठी बीजप्रक्रिया करावी. कोरडय़ा क्षेत्रात पेरणी करू नये. तसेच पेरणीनंतर अचानक मोठा पाऊस झाल्यास जमिनीवर दाब पडल्यानेही बियाण्याची उगवण होत नाही. यासाठी परिस्थितीचा नीट अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. पाणी व्यवस्थापन, मजूर, आंतरमशागती तसेच कृषि औजारांचा वापर करताना कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा डोळसपणे वाजवी वापर केला पाहिजे. 

आपल्याकडे पाऊस ७ जूनला दाखल होतो. यंदा मोसमी पावसाला बराच विलंब झाला आहे. पण पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्याने पेरणीसाठीची तयारी बऱ्यापैकी आटोक्यात आहे. अजून पाऊस नसला तरीही जून अखेरीपर्यंत दरवर्षी सोयाबीन, भात, कडधान्याच्या पेरण्या केल्या जातात. त्या तुलनेत पावसाला विलंब झाला म्हणजे सगळा खरीप हंगाम धोक्यात आला असे म्हणता येणार आहे. अजून पेरणीची वेळ निघून गेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फारशी काळजी करण्याचे कारण नाही. कमी खर्चाचे तंत्रज्ञानाचा आणि उपलब्ध कृषी निविष्ठांचा कार्यक्षम वापर केल्यास निश्चितपणे आशादायक चित्र आहे. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतरही शेतकरी पेरण्या करू शकतो. मात्र, घाई-गडबड न करता आणि आपल्याला दुबार पेरणीची वेळ येणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.

प्रताप रघुनाथ चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, नागदेववाडी, ता. करवीर.

आजकाल जमिनीतील सेंद्रिय कर्ब खूप झालेला आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होतो. बदलते हवामान, पाऊसमान या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत, पण शेतीत काम करणाऱ्या मजुरांचे प्रशिक्षण, खतांचे भाव वाढल्याने गरजेइतकाचा त्यांचा वापर झाला आणि तो पिकांच्या वाढीच्या काळानुसार दिल्यास त्याचा अधिक उपयोग होईल. त्याचबरोबर पाण्याचा कार्यक्षम वापर केला तरच पीक आणि जमीन यांचे संरक्षण होऊ शकते. याकडे शेतकऱ्यांनी अधिक डोळसपणे पाहिले पाहिजे. – सतीशचंद्र नलावडे, सांगली

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in rains have increased kharif concerns delay in rain impact kharif crop zws