शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी प्रगल्भ गानप्रतिभेचे सादरीकरण करून लातूरकरांना मंत्रमुग्ध केले.
सूरश्री प्रतिष्ठानतर्फे दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात या मैफलीचे आयोजन करण्यात आले. उपशास्त्रीय, ठुमरी, दादरा, दाक्षिणात्य तिल्लाना तसेच रवींद्र संगीत या सर्वच संगीतप्रकारांवर या गायिकेची हुकमत आहे. याचे प्रत्यंतर मैफलीत आले. चक्रवर्ती यांनी सर्वप्रथम मारुबिहाग हा बडा ख्याल गायला. त्यानंतर ‘आ सजनवा कब आओगे’ ही पहाडी रागातील ठुमरी सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. पंडित अजय चक्रवर्ती यांनी स्वरबद्ध केलेली ही ठुमरी आपणास खूप आवडते, हेही त्यांनी सांगून टाकले. शोभा गुटरू यांनी ‘सैया निकल गये..’ ही भैरवी सादर केली. श्रोत्यांनी टाळय़ांचा प्रचंड कडकडाट करून त्यांच्या गायकीस दाद दिली. या मैफलीची सुरुवात भुजंग मुर्के यांच्या गायनाने झाली. कौशिकी यांना हार्मोनियमसाथ मिलिंद कुलकर्णी, तबलासाथ प्रशांत पांडव, तंबोऱ्याची साथ मेघुदीपा, सुरभी सोनवणे यांनी केली. प्रा. संदीप जगदाळे यांच्या ‘सुरेल इतिहासाची सोनेरी पाने’ या पुस्तकाचे विमोचन या वेळी करण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत देशमुख, सोनू डगवाल, अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, शिवदास देगलूरकर, पंडित शांताराम चिगरी, डॉ. मंजूषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaushik chkravarti musical show latur people enjoyed the musical show