पुष्कराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज ज्ञानोबा पन्हाळे (वय ४२) यांचा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरानजीक हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने खून केला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हरंगुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांपैकी चारजणांना अटक केली.
पन्हाळे हे मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज आटोपून आदर्श कॉलनी येथील घराकडे जात होते. घराजवळ गाडी लावून घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून हल्लेखोर आल्याचे पाहून ते आपल्या बचावासाठी पळाले. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले व हल्लेखोर पसार झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पन्हाळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात पन्हाळे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता हरंगुळ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार वैजनाथ शिंदे व सुधीर भालेराव, महापौर स्मिता खानापुरे यांच्यासह शहरातील सर्व पक्षांचे नेते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पन्हाळे यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, असा परिवार आहे.
दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत पन्हाळे यांचे ज्येष्ठ बंधू हरिभाऊ पन्हाळे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सात संशयितांपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. कमलाकर अनिरुद्ध बस्तापुरे, गोविंद कुटवाड, व्यंकट कुटवाड व गणेश अंगद सगर अशी त्यांची नावे आहेत. तपासासाठी संतोष व्यंकट पन्हाळे यास ताब्यात घेण्यात आले. व्यंकट ज्ञानोबा पन्हाळे व मधुकर अनिरुद्ध बस्तापुरे या दोघांना अजून ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारामुळे लातूर शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकीही जप्त केली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkraj travels panhale murdered case four arrested