छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम समारोहाच्या सांगता समारोहासाठी १६ सप्टेंबरला येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सभेसाठी तसेच मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने होणाऱ्या अन्य ठिकाणच्या मंडपासाठी नऊ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. कराड, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणाच्या पुरवठादारांनी महापालिकेकडे दरपत्रकेही पाठविली आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिमंडळ बैठकीबरोबरच मराठवाडा मुक्ती दिन साजरा करताना होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घुसडला गेल्याने त्यावर टीका होऊ लागली होती. या अनुषंगाने निर्माण होणारा रोष कमी करता यावा म्हणून शुक्रवारी आयोजक सदस्यांना बोलावून कोणकोणते अन्य सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत, त्यात ‘हास्यजत्रा’ हाही एक कार्यक्रम आहे, असा खुलासा करण्यात आला. मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येस अमित शहा यांची सभा होणार असल्याने ती सभा शहरातील अयोद्धानगरी भागात होणार आहे. गेल्या वर्षी हेैदराबाद मुक्तीचा सोहळा गृहमंत्र्यांनी हैदराबाद येथे केला होता. या वेळी मराठवाडय़ातही त्यांची हैदराबाद मुक्ती लढय़ाची सभा घेण्याचे योजिले आहे.

हेही वाचा >>>जगण्या-मरण्याच्या कसरतीत ओढाताण वाढली; दुष्काळाने अनेक कुटुंबांचे कंबरडे मोडले, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी

मराठवाडा मुक्तीचा सोहळा अधिक दिमाखदारपणे व्हावा म्हणून जी-२० समूह देशातील पाहुणे मंडळी आली होती, तेव्हा जशी रोषणाई करण्यात आली तशीच रोषणाई या वेळी केली जाणार आहे. विमानतळावर तसेच निवेदन द्यायला येणाऱ्यांना सुभेदार विश्रामगृहावरही जनतेसाठी स्वतंत्र मंडप टाकण्यात येणार आहेत. २९ मंत्री, विभागाचे सचिव तसेच स्वीयसहायक यासह मंत्रालयातील बहुतांश महत्त्वाचे अधिकारी येणार असल्याने त्यांच्या राहण्या- जेवणाच्या सुविधांसाठी आता समन्वय समित्या नेमण्याची कसरत प्रशासनाकडून सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी शुक्रवारी बैठक घेतली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 crore spent on pavilions marathwada liberation day commemoration ceremony amy