‘द केरला स्टोरी’ चित्रपट दि. ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय रंग देण्यात आले. परंतु, या चित्रपटातील काही वाक्यं नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. त्यातीलच एक वाक्य म्हणजे, आसिफा म्हणते, ‘इटिंग विदाऊट प्रेअर इज सीन.’ जेवणाच्या आधी प्रार्थना न करणं हे पाप आहे. याच संदर्भाने विविध धर्मांमध्ये जेवणाच्या आधी करण्यात येणाऱ्या प्रार्थनांबाबत जाणून घेणे उचित ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे घटना

‘द केरला स्टोरी’ चित्रपटात आसिफा एकदा तिच्या मैत्रिणींना म्हणजेच शालिनी, गीतांजली आणि निमाहला घेऊन फिरायला जाते. तेव्हा सगळे एका उपाहारगृहात जेवायला जातात. त्या वेळी जेवायच्या आधी आसिफा प्रार्थना करते. निमाहसुद्धा प्रार्थना करते. परंतु, शालिनी आणि गीतांजली प्रार्थना न करता जेवायला सुरुवात करतात. त्या वेळी शालिनी आसिफाला विचारते, ”तुम्ही परंपरा पाळणारे असाल, असं मला वाटलं नव्हतं. पण, तुम्ही कोणती प्रार्थना केली?” आसिफा म्हणते, ”मी अल्लाहला धन्यवाद दिले.” ”निमाह म्हणते की, ”मी जीजसचे आभार मानले.” आसिफा विचारते, ”तुमच्या धर्मात नाही म्हणत का प्रार्थना?” तेव्हा शालिनी म्हणते,” आमच्या धर्मातही म्हणतात. पण, मला चविष्ट पदार्थ दिसले, म्हणून मी खाण्यास सुरुवात केली.” तेव्हा आसिफा म्हणते, ”’इटिंग विदाऊट प्रेअर इज सीन.’

हेही वाचा : विश्लेषण : दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून कवी मोहम्मद इक्बाल यांना वगळण्याची शक्यता ? कोण आहेत मोहम्मद इक्बाल ? त्यांना ‘पाकिस्तानचे जनक’ का म्हटले ?

जेवणाच्या आधी प्रार्थना करण्याचा काय आहे इतिहास

पुरातत्त्वशास्त्रातील काही पुराव्यांनुसार मानव जेवण बनवताना, शिकारीला जाताना आणि शिकार मिळाल्यावर प्रार्थना करीत असे. वैदिक काळातही चांगले धान्य उत्पादित व्हावे, तसेच यज्ञातील हवन करण्याचे पदार्थ तयार करताना प्रार्थना केल्याचे आढळते. विविध धर्मांमध्ये आपल्याकडे जे आहे ते ईप्सित देवतेला अर्पण करून, तिचे आभार मानून मग आपण जेवावे, असे आढळते. जेवल्यावरही अन्नाला नमस्कार करण्याचीही प्रथा हिंदू आणि ख्रिश्चन धर्मामध्ये आहे. बायबलमध्ये याचा उल्लेख ‘Gratiarum actio’ असा आला आहे. म्हणजे कृतज्ञतापूर्वक कृती करणे होय. बायबलमध्ये येशू ख्रिस्त आणि सेंट पॉल यांनी एकत्रित जेवण करण्याच्या आधी प्रार्थना केली होती, असा उल्लेख आढळतो. मुख्यतः हिंदू, इस्लाम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि यहुदी धर्मांमध्ये जेवणाच्या आधी प्रार्थना करण्याची पद्धती असल्याचे आढळते.

हेही वाचा : विश्लेषण : काँग्रेस की भाजपा! लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला? कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय?

विविध धर्मांमधील पद्धती

हिंदू धर्मामध्ये ‘अन्नपूर्णा’ देवी ही अन्नदाती देवता मानली जाते. अनेक हिंदू घरांमध्ये स्वयंपाकघरात तिची स्थापना करण्याची पद्धत आहे. आद्य शंकराचार्यांनी अन्नपूर्णादेवीची स्तुती करणारी स्तोत्ररचना केली. तसेच या धर्मात जेवणाच्या आधी भूतयज्ञ करण्याची प्रथा आहे. जेवायच्या आधी जलचर, भूचर, खचर, देवता, पूर्वज आणि गरजू व्यक्ती यांना आपल्या अन्नाचा काही भाग देऊन मग आपण स्वतः जेवण करावे, अशी प्रथा आहे. तसेच प्रार्थनेसह नेवैद्य दाखवण्याची पद्धत हिंदू धर्मात असल्याची दिसते. तसेच काही वैदिक मंत्र, परंपरागत चालत आलेल्या प्रार्थना, नमस्कार करणे, जेवणाचा काही भाग बाहेर ठेवणे अशा पद्धती दिसून येतात. भगवदगीतेमधील ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर…. (४.२४) तसेच अहं वैश्वानारो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित…(१५.१४) हे श्लोक विशेषत्वाने वापरले जातात.ख्रिश्चन धर्मात जेवणाच्या आधी प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेला ‘ग्रेस’ असे म्हणतात. येशूख्रिस्ताची कृपा प्राप्त व्हावी, आज जशी अन्नप्राप्ती झाली तशी कायम व्हावी, या अर्थी प्रार्थना केली जाते. ख्रिश्चन धर्मामध्ये विविध प्रार्थना दिसतात. यातील काही प्रार्थना येशूची स्तुती करणाऱ्या आहेत. जेवणाच्या आधी म्हणायच्या प्रार्थना, जेवणानंतर म्हणायच्या प्रार्थना, मांसाहारी पदार्थ खाण्याच्या आधीच्या प्रार्थना, मांसाहार करून झाल्यावर म्हणायच्या प्रार्थना दिसतात. ‘ग्रेस’ सह याला ‘थँक्सगिव्हिंग’ असेही म्हणतात.इस्लाम धर्मामध्ये जेवण तयार करीत असताना आणि जेवणाच्या आधी अल्लाहचे स्मरण केले जाते. जेवण बनवत असताना ‘अल्लाहुम्मा बारीक लाना फिमा रझाकताना वकीना अथाबान-नार’ अशी प्रार्थना करण्यात येते. ‘बिस्मिल्लाह’ म्हणून जेवणास सुरुवात केली जाते. जेवून झाल्यावरही अल्लाहला धन्यवाद देण्यात येतात. तसेच पाणी पितानाही अल्लाहची प्रार्थना करण्यात येते. तसेच दोन-दोन घोट पाणी प्यावे असेही सांगितले आहे. याबाबत कुराणमध्ये विविध प्रार्थना दिल्या आहेत.
यहुदी धर्मामध्ये खाण्याच्या प्रकारानुसार प्रार्थना केल्या जातात. मैद्याचे पदार्थ, फळे, भाकरी, धान्यांचे पदार्थ असे प्रकार केलेले आहे. या प्रार्थनांना बिरकट हमाझॉन असेही म्हटले जाते. तसेच जेवणाच्या आधी हात धुणे हीदेखील धार्मिक क्रिया यहुदी धर्मात मानली जाते.
बौद्ध धर्मात जेवणाच्या पूर्वी नमस्कार केला जातो. बौद्ध भिख्खू हे जेवण वाढताना नम्रपणे आभार व्यक्त करतात. अन्नाची लालसा न बाळगण्याची प्रार्थना करतात. याप्रमाणेच जैन माझ्या अन्नामध्ये कोणतीही हिंसा, कोणत्याही जिवाला दुःख पोहोचलेले नसू देत असा भाव व्यक्त करणारी प्रार्थना करतात. ज्या जैन लोकांनी मूर्तिपूजा स्वीकारली ते, भगवान महावीरांना जेवण अर्पण करतात आणि मग जेवतात.

हेही वाचा : विश्लेषण : ‘अमूल’ आणि ‘आवीन’ वाद काय आहे ? त्याला राजकीय रंग का दिला गेला ?

आताच्या काळातील प्रार्थना

बदललेल्या जीवनपद्धतीमुळे जेवताना प्रार्थना करणे बऱ्याचदा शक्य होत नाही. काही लोकांना या प्रार्थनांविषयी माहितीही नसते. व्यावहारिक जगात जगत असताना सानेगुरुजी यांनी ‘वदनी कवळ घेता नाम घ्या कृषीवलांचे’ ही नवीन प्रार्थना लिहिली. जो शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो, त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. ज्यांनी जेवण तयार केले त्या अन्नदात्याचे आभार मानावेत, असा भाव सानेगुरुजी यांनी व्यक्त केला आहे.

‘इटिंग विदाऊट प्रेअर इज सीन’ हे ‘द केरला स्टोरी’मधील वाक्य नक्कीच अंतर्मुख करायला लावणारे आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating without prayer is sin meaning prayers before meals in every religion vvk
Show comments