डॉ.श्रीराम गीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिकत असताना एखादा कठीण अभ्यासक्रम करावासा वाटतो. हातात पदवी आल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करावासा वाटतो. नामवंत संस्था किंवा नामवंत कंपन्या यांचे संदर्भातील मनातील आकर्षण कोणाचेच लपत नसते. अभ्यासक्रमासाठी दिलेली पात्रता किंवा नोकरीसाठी नमूद केलेली पात्रता या दोन्ही गोष्टी वाचून सहसा ९५ टक्के विद्यार्थी किंवा पदवीधर त्याकडे वळतात. याच्या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या व वाद सुद्धा पाहिला मिळतात. पंधरा दिवसांपूर्वीच भारतातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणे व आवश्यक पात्रता यावरून गदारोळ उठला. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही बोर्डाच्या बारावीच्या शास्त्र शाखेच्या परीक्षेत ७५ टक्के किमान गुण हवेत अशी अट जाहीर करण्यात आली. ही होती पात्रता. करोना काळातील तीन वर्षांत ही पात्रता काढून टाकण्यात आली होती असे त्याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे. तत्वत: हे योग्य व रास्त समजायला हरकत नाही.       

पण वास्तव काय आहे?

संपूर्ण भारतातून जेईई या प्रवेश परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या १६ लाख असते. त्यातून दीड लाख विद्यार्थी पुढील अ‍ॅडवान्स परीक्षेकरता पात्र होतात. त्यातून फक्त सोळा हजार विद्यार्थी निवडले जातात. आता सुज्ञपणे व व्यावहारिक विचार केला तर असे लक्षात येईल की, जेमतेम एक टक्का विद्यार्थी यासाठी निवडतात. त्यांना किमान ७५ टक्के गुण हवेत अशी अट घातली आहे. आजवरचा गेल्या वीस वर्षांतील इतिहास असे सांगतो की कोणत्याही बोर्डाला ९९ परसेंटाइल मार्क घेऊन पास होणारा विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतो.

९९ परसेंटाइलचा अर्थ किमान ८८ ते ९० टक्के मार्क मिळवल्याशिवाय या गटात तो मोडत नाही. याचा साधा अर्थ म्हणजे क्षमता अत्युच्च पातळीचीच हवी. निव्वळ पात्रते करता ओरड करून किंवा पात्रता पाहून या परीक्षेचा रस्ता धरणाऱ्यांचा हिरमोड होणार. पालकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:ची अशी क्षमता ओळखणे महत्त्वाचे.

स्पर्धा परीक्षा

अशीच गोष्ट स्पर्धा परीक्षांचे संदर्भात कायम घडते. कोणत्याही शाखेची किमान पदवी ही अट स्पर्धा परीक्षांसाठी असते. पण स्पर्धक कोण असतात याचा विचार केला तर ७० टक्के स्पर्धक हे इंजिनिअरिंग पूर्ण केलेले असतात. त्यांचे वय अन्य पदवीधरांपेक्षा एक वर्षांनी जास्त असते. त्यांची आकलन क्षमता, गणिती क्षमता अन्य पदवीधरांपेक्षा खूपच चांगली असते. याचा फायदा घेऊन सोपा वैकल्पिक विषय निवडून अभ्यासात ते सहज बाजी मारतात. अन्य पदवीधरांनी समजा स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रयत्न केला तर तेही स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम बनू शकतात ना?

थोडे विनोदाने बोलायचे तर एकवीस हे वय मुलाचे लग्नासाठी पात्रतेचे आहे. पण एकविसाव्या वर्षी लग्न करणारा मुलगा सापडतो का? तो जेव्हा सक्षम होतो, कमावता होतो तेव्हाच त्याला ‘एलिजिबल बॅचलर’ असे संबोधले जाते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance for jee main preparation preparation strategy for competitive exams zws