Canadian PM Justin Trudeau: खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची मागच्या वर्षी कॅनडात हत्या झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे सातत्याने भारतावर आरोप करत होते. कॅनडातील शीख मतपेटीला सुरक्षित करण्यासाठी त्यांच्याकडून हे आरोप केले जात असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आरोपांना उत्तर देताना भारताने कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरीलच अडचणी वाढल्या आहेत. जस्टिन ट्रुडो यांना स्वपक्षातून विरोध होत असून नऊ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकि‍र्दीत ते पहिल्यांदाच राजकीय कोंडीत अडकले आहेत. तसेच पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत चालला असल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी कॅनडात बंद दाराआड झालेल्या बैठकीत लिबरल पार्टीच्या सदस्यांनी पंतप्रधानांविरोधात नाराजी प्रकट केली. तसेच २८ ऑक्टोबर पर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी २४ खासदारांच्या सह्यांचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. पक्ष जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वावर समाधानी नसल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हे वाचा >> पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान नक्की काय घडले? भारत-कॅनडातील तणावाचे कारण काय?

पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंना स्वपक्षातूनच आव्हान

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरील आव्हाने वाढली असली तरी त्यांचे समर्थक मात्र ही गोष्ट नाकारत आहेत. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॅनडातील सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हेच पंतप्रधान राहतील, असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. तथापि, बुधवारी तीन तासांच्या वादळी बैठकीनंतर जस्टिन ट्रुडो स्मितहास्य करत बैठकीतून बाहेर आले. “लिबरल पार्टी ही एकसंघ आणि मजबूत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधी पक्ष संघटन आणखी बळकट होईल”, असे ते म्हणाले.

जस्टिन ट्रुडो यांचे निकटवर्तीय आणि इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर म्हणाले की, बैठकीत खासदारांनी आपले म्हणणे पंतप्रधानांसमोर मांडले. जे सत्य होते, ते पंतप्रधानांना आवडो न आवडो पण त्यांना ते ऐकावेच लागणार आहे.

पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव

जून आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत लिबरल पक्षाच्या बालेकिल्ल्यातच पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसाठी आपण कमी पडत आहोत, अशी अनेक खासदारांची भावना झाली आहे. तसेच कन्झर्वेटीव्ह पक्षापेक्षाही कमी मतदान मिळत असून आपण मागे असल्याची भावना आता खासदारांमध्ये निर्माण झाली आहे. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत कन्झर्वेटीव्ह पक्षाला ३९ टक्के, लिबरल पक्षाला २३ टक्के आणि न्यू डेमोक्रॅट्स पक्षाला २१ टक्के इतके मतदान मिळाले. यावरून पुढील वर्षी कन्झर्वेटीव्ह पक्षा आरामात बहुमत प्राप्त करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

हे ही वाचा >> इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी; पंतप्रधान ट्रुडो पिता-पुत्रांमुळे भारत-कॅनडात वादाची ठिणगी कशी पडली?

संसदेत ठरले होते हास्याचा विषय

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी विरोधकांवर आरोप केले. यावेळी त्यांनी विरोधकांना ‘ब्रोकनिस्ट’ असे संबोधले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते पियर पोलिएवर यांनी संसदेतच ट्रुडो यांची थट्टा उडवली. पंतप्रधान ट्रुडो हे आता इंग्रजी भाषेवरही अन्याय करत असून भाषेत नसलेले शब्द घुसडवून भाषा तोडण्याचा (ब्रोकनिस्ट) प्रयत्न करत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांच्या भाष्यावर अनेकजण खदखदून हसत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada pm justin trudeau party colleagues ask him to resign set deadline kvg