चीन आणि करोना हे समीकरण दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. करोनाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विषाणू चीनमधूनच आला म्हणत चीनला टार्गेट केलं गेलं. पण चमत्कारीकरीत्या सर्वात आधी चीनमध्ये करोना मुक्तीचे दावे केले गेले. चीन सर्वात आधी सुरळीत व्यवहार करू लागला. त्यामुळे नंतर करोनाच्या चर्चेतून चीन पार हद्दपारच झाला. पण आता पुन्हा एकदा करोनामुळे चीन चर्चेत आला आहे. कारण चीनमध्ये मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीननं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून आता तर एका आख्ख्या शहरातच चीननं लॉकडाउन लागू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचं समोर आल्यानंतर चीननं एक मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण शहरात चीननं कठोर लॉकडाउन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.

एएफपी एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये मंगळवारी नव्या डेल्टा व्हेरिएंटचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६ रुग्ण हे लँझो शहरात आढळून आले आहेत. याआधी चीननं सोमवारी बीजिंगमधील पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. तसेच, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी शहराबाहेर जावं, असे देखील निर्बंध प्रशासनाने घातले आहेत. सोमवारी चीनमध्ये एकूण ३९ डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडले असून आता या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचं थैमान, विमानांचं उड्डाण रद्द, शाळाही बंद; अनेक ठिकाणी लॉकडाउनची घोषणा

खरंतर चीनमध्ये सापडलेल्या करोना रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. मात्र, चीननं सुरुवातीपासूनच शून्य रुग्ण धोरण अवलंबलं असल्यामुळे १०० रुग्णांचा आकडा देखील चीनसाठी काळजी वाढवणारा ठरला आहे. बीजिंगमधील अनेक रहिवासी भागांमध्ये चीननं लॉकडाउन लागू केला आहे.

विमानांचं उड्डाण रद्द, लॉकडाउनचाही निर्णय

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China records delta variant corona cases decides strict lockdown pmw
First published on: 26-10-2021 at 17:27 IST