रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भाजप सरकारने धाकदपटशा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत केले, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर रविवारी टीका केली. रांची येथे ‘इंडिया’च्या संयुक्त ‘उलगुलान’ सभेत ते बोलत होते.

हेही वाचा >>> उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या

रांचीतील प्रभात तारा मैदानावर ‘इंडिया’च्या घटक पक्षांची ‘उलगुलान न्याय’ सभा झाली. या वेळी खरगे म्हणाले की, हेमंत सोरेन यांनी आघाडीतून बाहेर पडण्यास नकार दिल्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. भाजप अशा प्रकारे आदिवासींवर दहशत बसवत राहिला तर त्या पक्षाचा पुरता सफाया होईल. या वेळी खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि संसद इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित न केल्याबद्दल मोदींवर टीका केली. भाजप आदिवासींना अस्पृश्य समजतो असा आरोप त्यांनी केला. या सभेला हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता उपस्थित होत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी प्रकृति अस्वास्थ्यामुळे सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘केजरीवालांना मारण्याचा कट’ सुनीता केजरीवाल यांनी आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, केजरीवाल यांच्या अन्नावर कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवली जात आहे. त्यांना इन्शुलिन दिले नाही. माझे पती मधुमेहाचे रुग्ण आहेत, गेल्या १२ वर्षांपासून त्यांना दररोज इन्शुलिनची ५० एकके घ्यावी लागतात.