विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील काही ऐतिहासिक उल्लेखांवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. एकीकडे NCERT च्या पुस्तकांमधील अयोध्येसंदर्भातील व बाबरी मशिदीसंदर्भातील उल्लेख बदलण्यात आल्यामुळे त्यावर मोटी चर्चा पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे गुजरात शिक्षण मंडळाच्या पुस्तकातील एका उल्लेखावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात गुजरात लोकसेवा आयोग (GPSC) व गुजरात बुद्धिस्ट अकॅडेमी (GBA) या दोन यंत्रणांकडून गुजरात शालेय शिक्षण पुस्तक अभ्यास विभागाकडे (GSBST) तक्रार दाखल केली आहे. चुकांची सुधारणा केली जाईल, असं आश्वासन जीएसबीएसटीकडून देण्यात आलं आहे.

नेमका आक्षेप काय?

जीपीएससी व जीबीएकडून दाखल करण्यात आलेल्या आक्षेपानुसार गुजरात बोर्डाच्या १२वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकामध्ये बौद्ध धर्माविषयी चुकीचे उल्लेख करण्यात आले असून त्यामुळे बौद्ध धर्माविषयी वेगळी प्रतिमा निर्माण होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच, हा प्रकार वाईट हेतूने करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात जीएसबीएसटीचे संचालक व्ही. आर. गोसाई यांनी चुका सुधारल्या जातील, असं आश्वासन दिलं आहे. हा प्रकार चुकून झाला असल्याचं जीएसबीएसटीचं म्हणणं आहे.

“बारावीचं समाजशास्त्राचं पुस्तक २०१७ साली छापण्यात आलं आहे. त्यात बौद्ध धर्माविषयी एक परिच्छेद आहे. त्याआधीचं पुस्तक २००५ साली छापण्यात आलं होतं. त्यातही हा परिच्छेद होता. यासंदर्भात पहिल्यांदाच आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून आम्ही त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे”, असंही गोसाई यांनी सांगितलं.

NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशीद हद्दपार; अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले!

पुस्तकात नेमका काय उल्लेख आहे?

या पुस्तकातल्या ‘इंडियन कल्चर अँड कम्युनिटी’ या धड्यामध्ये संबंधित उल्लेख आहे. या धड्यात बौद्ध धर्मासह भारतातील एकूण आठ धार्मिक समूहांवर माहिती देण्यात आली आहे. ‘शिखांप्रमाणेच भारतातील बौद्ध धर्मीयांची संख्याही कमी आहे. त्यातले बहुतांश बौद्ध धर्मीय महाराष्ट्रात राहतात. त्याव्यतिरिक्त पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशमध्येही त्यांचं काही प्रमाणात वास्तव्य आहे. सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध विचारसरणीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. बौद्ध विचारसरणीत प्रामुख्याने तीन शाखा आहेत. हीनयान, महायान आणि वज्रयान. याशिवाय बौद्ध धर्मात दोन स्तरदेखील आहेत. वरीष्ठ स्तरातील बौद्धांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि समाजातील काही एलिट वर्गातील लोकांचा समावेश आहे. तर कनिष्ठ स्तरामध्ये बौद्ध धर्मात धर्मांतरित झालेल्या आदिवासी आणि मागास वर्गातील लोकांचा समावेश आहे. बौद्ध धर्मासाठी सारनाथ, सांची आणि बोधीगया ही महत्त्वाची ठिकाणं मानली जातात. त्यांच्या धर्मगुरूंना लामा म्हटलं जातं. त्यांच्या धार्मिक स्थळांना बौद्ध मंदिर म्हटलं जातं. तिथे ‘इच्छा चक्रं’ असतात. त्रिपिटिका हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यांचा कर्म व पुनर्जन्म यावर विश्वास आहे’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

गुजराती बौद्ध अकादमीची पाच उत्तरं!

दरम्यान, गुजराती बौद्ध अकादमीकडून या उल्लेखांमध्ये नमूद करण्यात आलेल्या पाच असत्यांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

१. बौद्ध धर्म एखाद्या सागराप्रमाणे आहे. सर्व प्रकारच्या, सर्व गटांमधल्या लोकांचा बौद्ध धर्म स्वीकार करतो. त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मात जात व्यवस्था नाही.

२. बौद्ध धर्माचा पुनर्जन्मावर विश्वास नाही.

३. लामा हे बौद्ध धर्माचे धर्मगुरू नसून ते फक्त तिबेटमधील बौद्धांचे गुरू आहेत. बौद्ध धर्मातील धर्मगुरूंना भिख्खू म्हणतात.

४. बौद्ध मंदिरांमधील इच्छा चक्रं ही बौद्ध धर्माचं प्रतीक नसून ती तिबेटमधील एक प्रथा आहे. बौद्ध धर्माचं प्रतीक धम्मचक्र (अशोक चक्र) आहे.

५. बौद्ध धर्मीयांसाठी बौद्ध मंदिर हे धार्मिक ठिकाण नसून बौद्ध विहार हे धार्मिक ठिकाण आहे.

NCERT च्या पुस्तकातून अयोध्या प्रकरण गाळल्यानंतर राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

दरम्यान, गुजराती शालेय शिक्षण मंडळानं यासंदर्भातील योग्य माहिती देण्याची विनंती केली असून ती माहिती सर्व शाळांना पाठवली जाईल, असंही स्पष्ट केलं आहे. त्यानुसारच परीक्षेत प्रश्नही विचारले जातील. पुढच्या वेळी जेव्हा पुस्तक छापलं जाईल, तेव्हा हे बदल पुस्तकात केले जातील, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.