उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथे रामचेत यांचे जुन्या चप्पल दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानात टांगलेल्या चपला आणि बुटांना लोक सध्या लाखो रुपये देण्यास तयार आहेत. दुकानाचे मालक रामचेत यांना रोज नव्या नव्या ऑफर येत आहेत. मात्र रामचेत या चपला आणि बुटं विकण्यास तयार नाहीत. त्याचे कारणही खास आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी या दुकानाला भेट दिली होती. २६ जुलै एका खटल्यासाठी राहुल गांधी सुलतानपूर न्याायलयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी रस्त्यात रामचेत यांच्या दुकानाता थोडा वेळ घालविला. या दुकानात त्यांनी रामचेत यांच्याकडील चप्पल आणि बुटांची दुरूस्तीही केली. याच चप्पल आणि बुटांची खरेदी करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलतानपूर न्यायालयात आले असता राहुल गांधी यांनी रामचेतच्या दुकानात थांबून त्यांच्याशी संवाद साधला. या व्यवसायातून किती पैसे मिळतात, याची विचारपूस केली. तसेच स्वतः हे काम करण्याचा सराव केला. राहुल गांधी यांनी स्वतःहून चप्पल दुरुस्त करतानाचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामचेत यांना चप्पल आणि बुट शिवण्यासाठी एक यंत्र भेट देण्यात आले. या यंत्रामुळे रामचेत यांचे काम आणखी सोपे होणार आहे.

हे वाचा >> “पास्ता विथ कडीपत्ता…”, राहुल गांधींच्या जात प्रकरणात खासदार कंगना यांची उडी; म्हणाल्या, “स्वतःची जात…”

रामचेत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, राहुल गांधी भेटून गेल्यापासून त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे. लोक माझ्या दुकानासमोर गाडी थांबवत आहेत. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कुतुहल वाटते. लोक मला आदर देत आहेत, ही बाब सुखावणारी आहे.

रामचेत पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांनी दुरूस्त केलेल्या चप्पल आणि बुटासाठी काही लोकांनी मला फोन केले. या बुटासाठी ते १० लाखांपर्यंत मोबदला देण्यासाठी तयार आहेत. काही जणांनी ५ लाखांपासून सुरूवात केली आणि १० लाख रुपये देऊ असे सांगितले. एकाने तर बॅग भरून पैसे देईल, असेही सांगितले. पण मी सर्व ऑफर फेटाळून लावल्या. मला या चप्पल आणि बुट विकायच्या नाहीत.” माध्यमांनी याचे कारण विचारले असता ते गमतीत म्हणाले की, राहुल गांधी आता माझे व्यावसायिक भागीदार आहेत. आम्ही एकत्र येऊन व्यवसाय करत आहोत.

रामचेत पुढे म्हणाले की, ज्यांनी या चपला आणि बुट माझ्याकडे दुरूस्तीसाठी दिले होते, त्यांना मी ते परत करणार नाही. त्याबदल्यात मी त्यांना पैसे देऊ करेल.

हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका!

राहुल गांधींबरोबर काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल गांधींनी माझे काम जाणून घेतले. मी ते दाखविल्यानंतर त्यांनीही काही चपला दुरूस्त केल्या. माझ्या दुकानात वीज नाही, हे मी त्यांना सांगितले. राहुल गांधी येऊन गेल्यानंतर आता माझ्या दुकानात यंत्रणेची लोक येऊन माझ्या काय समस्या आहेत, हे विचारत आहेत. पण याआधी कुणीही मला विचारत नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis stiched slippers are getting costly sultanpur mochi ram chait life changing after gandhi visit kvg